महत्वाच्या बातम्या

 सहकार क्षेत्राच्या वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक : जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक प्रमोद पिपरे  


- गडचिरोली येथे सहकारी संस्थेचे संचालक व सेवकांसाठी दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : सहकार क्षेत्राचे काम जिल्ह्यात कमी आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अनेक उद्योग कारखाने निर्माण झाले असून नवनवीन उद्योग उभारून तेथील सहकारी संस्था आर्थिक विकासाकडे वाटचाल करीत आहेत. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील सहकारी संस्था प्रशिक्षण व नियोजना अभावी बंद होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यातील सहकारी संस्था, पतसंस्थाच्या यशस्वी वाटचाली करिता चांगल्या मार्गदर्शनाची व नियोजनाची आवश्यकता आहे. सहकारी संस्थेचे संचालक, सेवक व संस्था कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन सहकारी संस्था चांगल्या रीतीने चालवणे ही काळाची गरज आहे.

सहकार क्षेत्राला चांगल्या वाटचालीसाठी सर्व संस्थांनी व पतसंस्थेच्या पदाधिकारी संचालकांनी परिश्रम घेऊन व्यवस्थित नियोजन करणे गरजेचे आहे. नियोजनबद्ध काम होत नसल्याने जिल्ह्यातील अनेक संस्था, पतसंस्था बंद पडलेल्या आहेत. संचालक, संस्थेचे पदाधिकारी व संस्था सेवकांनी या कार्यशाळेचा लाभ घेऊन आपापल्या संस्था वाढीचा प्रयत्न करावा व सहकार क्षेत्राच्या वाढीसाठी आपले योगदान द्यावे, असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक तथा माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांनी केले. गडचिरोली येथील दि आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्था मर्या. गडचिरोलीच्या सभागृहात आयोजित दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे तथा गडचिरोली जिल्हा सहकारी बोर्ड लिमिटेड गडचिरोली व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने सहकारी संस्था व पतसंस्थेचे पदाधिकारी संचालक व सेवकांसाठी दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी जंगल कामगार सोसायटीच्या  सभागृहात करण्यात आले होते. या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक प्रमोद पिपरे होते. तर कार्यशाळेचे उद्घाटन सहायक उपजिल्हा निबंधक सव्वालाखे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून जंगल कामगार सहकारी संस्था मर्यादित गडचिरोलीचे अध्यक्ष घनश्याम मडावी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त मुख्य व्यवस्थापक अरुण निंबेकार, वर्धा येथील पतसंस्था फेडरेशनचे विशेष वसुली व जप्ती विक्री अधिकारी अरुणराव सुरकार, जिल्हा सहकारी बोर्डाचे सहकार शिक्षणाधिकारी पि. व्ही. तलमले वडसा नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक डॉ. जगदीश मुनघाटे, देसाईगंज सहकारी पतसंस्थेचे संचालक विठ्ठलराव गेडाम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद पिपरे यांच्या हस्ते कार्यशाळेत उपस्थित संचालक व सेवकांना प्रशिक्षण किटचे वाटप करण्यात आले. या कार्यशाळेत सेवा सहकारी संस्थेचे सभासद, आदिवासी विविध कार्यकारी संस्था नागरी व ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था, पगारदार सहकारी संस्था यांचे प्रतिनिधी व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक सहकार शिक्षणाधिकारी पी.व्ही तलमले यांनी केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos