जागतिक आदिवासी गौरवदिनी लोकबिरादरी प्रकल्पात वृक्षारोपण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
तालुक्यातील जागतिक किर्तीचे समाजसेवा केंद्र लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे जागतिक आदिवासी गौरव- दिनाचे औचित्य साधून आज सोमवार ०९ ऑगस्ट २०२१ रोजी वृक्षदिंडी काढून प्रकल्पाचे जागेवर विविध प्रजातींचे रोपटे लावून वृक्षारोपण करण्यात आले.
आदिवासी संस्कृती आणि पर्यावरण यांचा अगदी जवळचा संबंध आहे. जंगल व जंगलात वावरणारे पशू-पक्षी,किटक व अन्य जीवजंतू यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते. त्यामुळे वृक्षांना फार महत्त्वाचे स्थान आहे. त्याकरिता दरवर्षी लोकबिरादरी प्रकल्पातर्फे वृक्षदिंडी काढून ०९ ऑगस्टला जागतिक आदिवासी गौरवदिनी वृक्षारोपण केले जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा जागतिक आदिवासी गौरवदिनाचे औचित्य साधून प्रकल्पाचे जागेवर विविध जातींच्या रोपट्याचे रोपन करण्यात आले.
सर्वप्रथम वृक्षदिंडी काढण्यात आली. पर्यावरणावर आधारित विविध घोषणा देत आश्रम शाळा ते प्राणी अनाथालयाचे मागच्या बाजूला मोकळ्या जागेत वृक्षदिंडी पोचली. तद्नंतर क्रांतिवीर बिरसा मुंडा, कर्मयोगी बाबा आमटे, साधनाताई आमटे यांच्या प्रतिमांपुढे मान्यवरांच्या हस्ते द्विप प्रज्ज्वलित करून व पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. यावेळी मुंबई येथिल वास्तुविशारद मार्बन आणि ऊर्मी,  लोकबिरादरी आश्रम शाळेच्या व्यवस्थापिका समिक्षा आमटे, प्राचार्य डॉ.विलास तळवेकर,जेष्ठ कार्यकर्ते मनोहर येम्पलवार, मुख्याध्यापक शरिफ शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
' एक कुटुंब, एक झाड ' उपक्रमांतर्गत प्रकल्पातील प्रत्येक कुटुंबांतील सदस्यांनी व आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रजातींचे रोपटे लावले. यामध्ये जाईंट बांबू, ब्रॅन्डीस बांबू, अपल बोर, फणस, अव्हाकोडा, अंजीर, काळा जांब, स्टार फ्रुट, कलमी चिंच, रिठा, आवळा, लॉंजस टोनिया, फालसा, टेबुबिया,व्हॉट्स ॲपल, कापूर, चकोतरा, जांभूळ, मिलन टोनिया, खैर, दशहरी आंबा, बारमाही आंबा, आम्रपाली आंबा, लंगडा आंबा, लिची, अंजीर, संत्रा, शहतुत इत्यादी वृक्षांचे रोपटे लावण्यात आले. वृक्षारोपनाचे यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक विवेक दुबे व चमुने अथक परिश्रम घेतले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-08-09
Related Photos