जनावरांच्या चाऱ्याला लागली आग : आगीत होरपळून जनावराचा मृत्यू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / खाबांडा : शेगाव येथून जवळच असलेल्या चारगाव खुर्द येथे काल ५ एप्रिलला दुपारच्या सुमारास शेतात असलेल्या मांडवाला आग लागली. या आगीत मांडवा खाली असलेले म्हशीचे वगार याचा जागीच होरपळून मृत्यू झाला.
चारगाव खुर्द येथील युवा शेतकरी विलास चवले यांच्या शेतात दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने या शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले. या आगीत तीन म्हशी अंदाजे रक्कम एक लाख पन्नास हजार तसेच त्यांचे तीन पिल्लू अंदाजे रक्कम ३० हजार रु. तसेच जनावरांचा चारा यात गवांडा, कुटार, तनिस, जळून खक झाले. यात या शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले असून या शेतकऱ्याला शासनकडून आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकरी करू लागले आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागताच विलास चवले यांनी आपल्या शेतामध्ये जनावराच्या सोई करिता मांडवाची निर्मिती केली होती. या मांडवात त्यांच्याकडे असलेले सर्व जनावरे दुपारच्या वेळेस शेतातील मांडवात राहत होते. शिवाय मांडवात जनावरांचा चारा देखील होता. दरम्यान अचानक दुपारच्या वेळेस आग लागल्याने सर्व जळून खाक झाले.
ही आग विद्युत तारांच्या स्पर्शाने शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे शेती सोबत जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या विलास चवले या शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. सुदैवाने त्यांचे काही जनावरे दूर झाडाच्या खाली बांधून असल्याने बैल जोडी तसेच काही जनावरे सुखरूप वाचले.
News - Chandrapur