तात्पुरते फटाका परवाने आता तालुकास्तरावरच मिळणार जिल्हाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांकडे अधिकार सुपूर्द


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी आता व्यावसायिकांना जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज भासणार नाही. अर्जदारांची गैरसोय आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा अधिकार तालुकास्तरावर दिला असून, संबंधित तहसीलदार तथा तालुका दंडाधिकाऱ्यांना परवाने निर्गमित करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.
दिवाळीच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तात्पुरते फटाके स्टॉल्स लावले जातात. यासाठी परवाना मिळवण्यासाठी जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील अर्जदारांना गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. ही समस्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रशासकीय विकेंद्रीकरणाचा निर्णय घेत संबंधित तहसीलदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी हे अधिकार दिले आहेत.
त्यामुळे फटाका विक्री परवाना घेऊ इच्छिणाऱ्या स्थानिक अर्जदारांनी जिल्हा मुख्यालयात न येता, आपल्या संबंधित तालुका तहसील कार्यालयाशी संपर्क साधून रीतसर अर्ज व पुढील आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.




Petrol Price




