महत्वाच्या बातम्या

 जखमी कासवावर उपचार करून निसर्गाच्या कुशीत मुक्त : माने दाम्पत्याचा माणुसकीचा आदर्श


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : रेल्वे मार्गाजवळ जखमी अवस्थेत आढळलेल्या सुमारे दोन किलो वजनाच्या मादी कासवावर दीड महिना उपचार करून तिला पूर्णपणे निरोगी केल्यानंतर वर्धा नदीत सोडण्यात आले. साईबाबा वॉर्डातील रहिवासी विशाल राजू माने आणि त्यांच्या पत्नी अनुष्का माने यांनी मुक्या जीवाप्रती माणुसकी आणि संवेदनशीलता जपत कासवाला जीवदान दिले. कुटुंबाचा भाग बनलेल्या कासवाला निसर्गाच्या कुशीत मुक्त करताना माने दाम्पत्याने वन्यजीव संरक्षणाचा आदर्श समाजासमोर ठेवला.

विशाल माने यांना साईबाबा वॉर्डाजवळून जाणाऱ्या रेल्वे मार्गालगत सुमारे दोन किलो वजनाचे मादी कासव जखमी अवस्थेत आढळले. त्यांनी तातडीने कासवाला घरी आणून त्याच्यावर उपचार सुरू केले. सुरुवातीला हळद लावून त्याची काळजी घेण्यात आली. त्यानंतर सातत्याने देखभाल केल्यामुळे कासवाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. सुमारे दीड महिन्याच्या उपचारांनंतर ते पूर्णपणे निरोगी झाले.

उपचार सुरू असताना कासव आणि माने कुटुंबीयांमध्ये जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. विशाल माने घरात जिथे जात, तिथे कासवही त्यांच्या मागे जात असे. हळूहळू ते कुटुंबातील एक सदस्यच बनले. त्यामुळे कासवाला घरातून दूर करण्याची कल्पनाही कुटुंबीयांना भावनिक करणारी होती. मात्र, वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्तपणे जगण्याचा अधिकार आहे, याची जाणीव ठेवून माने दाम्पत्याने त्याला नदीत सोडण्याचा निर्णय घेतला.

कासवाला वर्धा नदीच्या काठावर सोडण्यात आले. नदीकाठी ठेवताच ते हळूहळू पाण्याच्या दिशेने चालत गेले आणि नदीत प्रवेश करून दिसेनासे झाले. दीड महिना ज्या जीवाची काळजी घेतली, त्याला निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त करताना माने कुटुंबीय भावुक झाले. मात्र, कासवाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात जगण्याची संधी दिल्याचे समाधानही त्यांच्या मनात होते.

कासव घरात ठेवल्याने संपत्ती वाढते आणि व्यवसायात भरभराट होते, अशा समजुती समाजात प्रचलित आहेत. मात्र, वन्यजीवांना पाळीव वस्तू म्हणून पाहण्याऐवजी त्यांचे संरक्षण करणे आणि त्यांना नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे जगू देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. संरक्षित वन्यजीवांच्या संवर्धनासाठी जनजागृती होणेही आवश्यक आहे. विशाल राजू माने आणि अनुष्का माने यांनी जखमी कासवावर उपचार करून त्याला नवजीवन दिले. स्वतःच्या भावनांपेक्षा त्या मुक्या जीवाच्या स्वातंत्र्याला प्राधान्य देत त्यांनी केलेली कृती वन्यजीवांप्रती प्रेम, करुणा आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देणारी ठरली आहे.





  Print






Related Photos