महत्वाच्या बातम्या

 दीक्षाभूमी मुक्तीसाठी १६ सप्टेंबरला आक्रोश मोर्चा


- जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार जनआंदोलन; बुद्धविहाराबाबतचा संभ्रम दूर करण्याची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : येथील पवित्र दीक्षाभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक बुद्धविहार पाडला जाणार असल्याच्या चर्चेमुळे बौद्ध समाजबांधवांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमी मुक्ती जनआंदोलनच्या वतीने १६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबतची माहिती जनआंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दीक्षाभूमीवरील संभ्रम दूर करण्यासाठी ३ सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न देताच बैठक अर्धवट संपविण्यात आल्याचा आरोप जनआंदोलन समितीने केला आहे. त्यामुळे समाजबांधवांमधील संशय आणखी वाढल्याचे समितीचे म्हणणे आहे.

दीक्षाभूमी मुक्त करून ऐतिहासिक बुद्धविहाराचे पुनरुज्जीवन करावे तसेच विकासकामांबाबत जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडून जनभावनेचा आदर करावा, अशी मागणी समितीने केली आहे. विकासकामांच्या वेळी नेमक्या कोणत्या वास्तू पाडल्या जाणार आहेत, याचा स्पष्ट खुलासा प्रशासन व संबंधित संस्थेने करावा, अशी प्रमुख मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीमध्ये एकाच कुटुंबातील सदस्यांचे वर्चस्व असल्याचा आरोपही समितीने केला. गेल्या ३६ वर्षांत दीक्षाभूमी अथवा बुद्धविहाराचा अपेक्षित ठोस विकास झालेला नाही, असा दावाही पत्रकार परिषदेत करण्यात आला.

या प्रश्नावर आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी १७ ऑगस्ट रोजी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन येथे शेकडो बौद्ध अनुयायांची बैठक झाली होती. त्यावेळी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आगामी १५ व १६ ऑक्टोबर रोजी होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा सर्वसामान्य समाजाच्या सहभागातून पार पाडण्यासाठी प्रशासनाने मध्यस्थी करावी, अशी मागणी करण्यात आली होती.

दरम्यान, १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार असून, मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. दीक्षाभूमीच्या विकासकामांबाबत पारदर्शकता ठेवून बुद्धविहाराच्या अस्तित्वाबाबतचा संभ्रम तातडीने दूर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेला भन्ते अनिरुद्ध थेरो, देशक खोब्रागडे, प्रतीक डोर्लीकर, राजस खोब्रागडे, ॲड. प्रियंका चव्हाण, करण सोमकुंवर, सिद्धार्थ शेंडे, चैतन्य बाबाज यांच्यासह जनआंदोलन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






Related Photos