महत्वाच्या बातम्या

 निर्माणाधीन पाण्याच्या टाकीवरून पडून १७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू


- झिरोबा येथील घटना; एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने मजुरांमध्ये हळहळ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / लाखांदूर : तालुक्यातील झिरोबा येथे निर्माणाधीन पाण्याच्या टाकीवरून पडून १७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवार, २ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. दस्तगीर महबुब आलम  १७ वर्षे रा. गंडाल, पश्चिम बंगाल असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, कामावरील मजुरांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे. झिरोबा येथे मागील सात ते आठ महिन्यांपासून पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे. या कामासाठी पश्चिम बंगालमधील काही मजूर येथे आले असून, ते बांधकामाच्या कामात गुंतले आहेत. बांधकाम करणाऱ्या मजुरांच्या प्रमुखासोबत त्याचा चुलत भाऊ दस्तगीर हा सुमारे दोन ते तीन महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालहून लाखांदूर येथे आला होता. दस्तगीर हा बांधकामाच्या मुख्य कामात सहभागी नसला तरी कामावरील मजुरांना पाणी देणे तसेच गरजेनुसार लहान-मोठी कामे करून मदत करीत होता, अशी माहिती मजुरांनी दिली.

मजुरांना मदत करताना अपघात -
घटनेच्या दिवशी सकाळी काही मजूर पाण्याच्या टाकीच्या वरच्या भागात काम करीत होते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास दस्तगीरही मजुरांकडे टाकीवर चढला. वर पोहोचल्यानंतर तो सभोवताली फिरत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. दस्तगीर खाली पडल्याचे लक्षात येताच कामावरील मजुरांनी तत्काळ त्याच्याकडे धाव घेतली. त्याला तातडीने उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

आईचे लहानपणीच निधन -

दस्तगीर हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. तो लहान असतानाच त्याच्या आईचे निधन झाले होते. त्यानंतर त्याच्या वडिलांनी दुसरे लग्न केले आणि ते दुसऱ्या पत्नीसोबत राहू लागले. गावात करमत नसल्याने दस्तगीर सुमारे तीन महिन्यांपूर्वी आपल्या चुलत भावासोबत लाखांदूर येथे आला होता. लाखांदूर येथे कामाच्या ठिकाणी असतानाच त्याच्यावर काळाने घाला घातला. त्याच्या आकस्मिक मृत्यूची माहिती मिळताच कामावरील मजुरांनी ग्रामीण रुग्णालयातच हंबरडा फोडला. एकुलत्या एक दस्तगीरचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा -
घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. हवालदार संतोष चव्हाण, राकेश हेमके तसेच अंमलदार लंकेश राऊत, संदीप केंद्रे आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनेचा पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत. दरम्यान, दस्तगीर हा अल्पवयीन असून कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या कुटुंबीयांना शासन अथवा संबंधित यंत्रणेकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.





  Print






Related Photos