दारूच्या नशेत विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

- शेतातील विहिरीच्या ओट्यावर झोपला होता युवक; मेयो रुग्णालयात डॉक्टरांनी केले मृत घोषित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : दारूच्या नशेत शेतातील विहिरीच्या ओट्यावर झोपलेल्या तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी घडली. आशिष संपत खमटकर ३३ वर्षे रा. गाव खजरी, ता. घोघरा, जि. मंडला, मध्य प्रदेश असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष खमटकर हा गिट्टीखदान परिसरातील शेडमे यांच्या शेतात गेला होता. शेतातील विहिरीच्या ओट्यावर तो झोपला होता. यावेळी तो दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येते. झोपेत कडेला वळल्याने त्याचा तोल गेला आणि तो विहिरीतील पाण्यात पडला.
घटनेची माहिती मिळताच मदतकार्य सुरू करण्यात आले. फायर ब्रिगेडच्या पथकाच्या मदतीने आशिषला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मोहसीम मोहम्मद कुरेशी ३२ वर्षे रा. नागपूर यांनी पोलिसांना दिली. त्यांच्या सूचनेवरून गिट्टीखदान पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि इतर बाबींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.




Petrol Price




