महत्वाच्या बातम्या

 सहा वर्षांपासून NH-353C चे बांधकाम रखडले : निकृष्ट कामाच्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करा!


- स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कामावर प्रश्नचिन्ह; कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या संभाव्य संगनमताची चौकशी करण्याची संतोष ताटीकोंडावार यांची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : दक्षिण गडचिरोलीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-सी (NH-353C) च्या बांधकामाला सहा वर्षांचा कालावधी उलटूनही काम पूर्ण झालेले नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच महामार्गाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कामाची स्वतंत्र उच्चस्तरीय तांत्रिक व आर्थिक चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष रामचंद्र ताटीकोंडावार यांनी केली आहे. कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या संभाव्य संगनमतातून शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा गैरवापर झाला आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

महामार्गावर टाकण्यात आलेल्या खडी आणि मुरूम भरावाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. समोर आलेल्या छायाचित्रात अवजड वाहनाची चाके खडी-मुरूमच्या भागात रुतल्यासारखी दिसत असल्याने बांधकामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष स्थळपाहणी करून भरावाची जाडी, कॉम्पॅक्शन, वापरण्यात आलेले बांधकाम साहित्य आणि कामाची तांत्रिक गुणवत्ता यांची स्वतंत्र तपासणी करणे आवश्यक असल्याचे ताटीकोंडावार यांनी म्हटले आहे.

जनतेच्या करातून मिळालेला कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार महामार्ग उपलब्ध होत नसेल, तर याची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. गेल्या सहा वर्षांपासून नागरिकांना धूळ, खड्डे, चिखल आणि वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचा सर्वाधिक त्रास गरोदर माता, रुग्ण, विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत असून, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या संबंधित अभियंते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कोणत्या तपासण्या केल्या? निकृष्ट काम आढळल्यास कंत्राटदाराची देयके रोखण्यात आली का? कामातील त्रुटींसाठी दोषदायित्व निश्चित करण्यात आले का? या सर्व बाबींची माहिती जनतेसमोर आणण्याची मागणी त्यांनी केली आहे. जिल्हा प्रशासनाने केवळ कागदोपत्री अहवालांवर समाधान न मानता स्वतंत्र तांत्रिक पथकामार्फत प्रत्यक्ष घटनास्थळी चौकशी करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पाच प्रमुख मागण्यांद्वारे चौकशीचा आग्रह -
स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन कंपनीशी संबंधित महामार्गाच्या कामाची स्वतंत्र उच्चस्तरीय तांत्रिक व आर्थिक चौकशी करावी. खडी, मुरूम, जीएसबी (GSB), भराव आणि कॉम्पॅक्शनची प्रयोगशाळेमार्फत गुणवत्ता तपासणी करावी. कामाची मोजमाप पुस्तिका (MB), गुणवत्ता तपासणी अहवाल, कंत्राटदाराला अदा केलेली देयके आणि मंजूर आराखड्यांची पडताळणी करावी. कंत्राटदारासह संबंधित अभियंते व अधिकाऱ्यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करावी. चौकशीत आर्थिक गैरव्यवहार, निकृष्ट बांधकाम अथवा संगनमत सिद्ध झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून शासनाच्या नुकसानीची वसुली करावी, अशा पाच प्रमुख मागण्या ताटीकोंडावार यांनी केल्या आहेत.

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा -
जनतेच्या कराच्या पैशातून उभारला जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या मनमानीचा विषय नाही. सहा वर्षांपासून नागरिक त्रस्त असताना जिल्हा प्रशासन गप्प का? महामार्गाच्या कामाचा दर्जा, खर्च झालेला निधी आणि जबाबदार व्यक्तींची चौकशी झालीच पाहिजे. अन्यथा जनहितासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतोष रामचंद्र ताटीकोंडावार यांनी दिला आहे. ताटीकोंडावार हे सामाजिक कार्यकर्ते असून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे पदसिद्ध सदस्य, जनकल्याण समाज उन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र ट्रायबल ॲक्शन पीपल कमिटीचे उपाध्यक्ष आहेत.





  Print






Related Photos