महत्वाच्या बातम्या

 दुर्गम अरततोंडीची पूर्वा लोठे राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्समध्ये अव्वल : सुवर्णपदकाची कमाई


- चिपळूण येथील ४०व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दमदार कामगिरी; चेन्नईतील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील अरततोंडी गावच्या कन्येने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अरततोंडी येथील रहिवासी आणि सध्या गोंदिया येथे शिक्षण घेत असलेल्या पूर्वा जगदीश लोठे हिने चिपळूण येथे झालेल्या ४०व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

भारतीय खेळ प्राधिकरणांतर्गत चिपळूण येथे २४ ऑगस्टदरम्यान ही राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा पार पडली. राज्यातील ३० जिल्ह्यांतील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. विविध क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावले असताना पूर्वा लोठे हिने आपल्या अष्टपैलू कामगिरीने लक्ष वेधून घेतले.

सात क्रीडा प्रकारांत पूर्वाची दमदार कामगिरी -
पूर्वा लोठे हिने स्पर्धेत १०० मीटर अडथळा शर्यत, उंच उडी, गोळाफेक, २०० मीटर धावणे, लांब उडी, भालाफेक आणि ८०० मीटर धावणे अशा सात क्रीडा प्रकारांत सहभाग घेतला. या प्रकारांमध्ये तिने अव्वल दर्जाची कामगिरी करून सुवर्णपदक पटकावले.  अतिदुर्गम भागातील गावातून आलेल्या पूर्वाने राज्यस्तरीय स्पर्धेत मिळविलेल्या या यशामुळे अरततोंडी गावासह अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर मोठे यश संपादन करता येते, हे पूर्वाच्या कामगिरीने दाखवून दिले आहे.

गोंदिया येथील खेलो अ‍ॅथलेटिक्स सेंटरमध्ये प्रशिक्षण -
पूर्वा लोठे ही जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गोंदिया अंतर्गत असलेल्या खेलो अ‍ॅथलेटिक्स सेंटर, गोंदियाची खेळाडू आहे. प्रशिक्षक जागृत शेलोकर यांच्या मार्गदर्शनाखाली ती नियमित सराव करीत आहे. प्रशिक्षणातील सातत्य, कठोर मेहनत आणि स्पर्धेपूर्वीची तयारी यामुळे तिला राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करता आली. तिच्या या यशामागे प्रशिक्षकांचे मार्गदर्शन तसेच कुटुंबीयांचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले आहे.

आता चेन्नईत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व -

राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर पूर्वा लोठे हिची चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत ती महाराष्ट्र संघाकडून खेळणार आहे.राज्यस्तरावर यश मिळवल्यानंतर आता राष्ट्रीय पातळीवर कामगिरी उंचावण्याचे आव्हान पूर्वासमोर आहे. अतिदुर्गम अरततोंडी गावातून सुरू झालेला तिचा क्रीडा प्रवास आता राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत पोहोचल्याने परिसरातील विद्यार्थी आणि नवोदित खेळाडूंसाठी ती प्रेरणास्थान ठरत आहे.

पूर्वाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तालुक्यातील क्रीडाप्रेमी, शिक्षक, नागरिक आणि विविध स्तरांतून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. चेन्नई येथील राष्ट्रीय स्पर्धेतही पूर्वाने दमदार कामगिरी करून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा तिला देण्यात येत आहेत.





  Print






Related Photos