महत्वाच्या बातम्या

 पूर ओसरताच पूरपीडितांच्या मदतीला पुन्हा धावले लायड्स


- आरोग्यसेवेनंतर ब्लँकेट, चादरी, कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या शिधा किटचे वाटप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : सलग चार दिवस, २५ ते २८ सप्टेंबरदरम्यान आलेल्या पुरामुळे अतिदुर्गम भामरागड तालुक्यात जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. पूरस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला, घरांमध्ये पाणी शिरले आणि नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले. अशा संकटाच्या काळात लायड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तत्परतेने पुढाकार घेतला. विशेष म्हणजे, पूर ओसरल्यानंतरही मदतीचा हात कायम ठेवत कंपनीने आरोग्यसेवेसोबतच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

पूरस्थितीची माहिती मिळताच लायड्सचे एम.डी. प्रभाकरन यांनी तातडीने विशेष वैद्यकीय पथक भामरागड येथे पाठविण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक एअर लिफ्टद्वारे भामरागडमध्ये दाखल झाले. पूरामुळे भामरागडचा बाहेरील जगाशी संपर्क मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेला असतानाही या वैद्यकीय पथकाने स्थानिक आरोग्य व्यवस्थेला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला.

पाच दिवस वैद्यकीय सेवा -
लायड्सच्या वैद्यकीय पथकाने ग्रामीण रुग्णालयात डॉ. कन्नाके यांच्या समवेत तब्बल पाच दिवस आरोग्यसेवा दिली. प्रतिकूल परिस्थिती असूनही पथकाने रुग्णालयातच मुक्काम करून पूरग्रस्त नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. आपत्तीच्या काळात आरोग्यसेवेची मोठी गरज असताना तज्ज्ञ वैद्यकीय पथक तत्काळ उपलब्ध झाल्याने स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

पूराचे पाणी ओसरल्यानंतर परिस्थिती काही प्रमाणात पूर्वपदावर येऊ लागली; मात्र पूरग्रस्त नागरिकांच्या अडचणी कायम होत्या. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले होते. काही कुटुंबांना आपले घर सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला होता. त्यातच वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था पूर्वपदावर येण्यास वेळ लागत असल्याने नागरिकांसमोर जीवनावश्यक वस्तूंचीही मोठी समस्या निर्माण झाली होती.

मदतीचा दुसरा टप्पा -
ही परिस्थिती लक्षात घेऊन लायड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने मदतीचा दुसरा टप्पा सुरू केला. पूरग्रस्त कुटुंबांना ब्लँकेट, चादरी, कपडे, तांदूळ, डाळ, खाद्यतेल, मीठ तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेल्या शिधा किटचे वाटप करण्यात आले. पूरामुळे दैनंदिन संसार विस्कळीत झालेल्या कुटुंबांना या मदतीमुळे मोठा आधार मिळाला. आरोग्यसेवेनंतर थेट कुटुंबांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन करण्यात आलेल्या या मदतीमुळे आपत्तीग्रस्त नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

संकटाच्या काळात प्रत्यक्ष मदतीचा हात -
अतिदुर्गम भामरागडसारख्या भागात आपत्तीच्या काळात तातडीने वैद्यकीय पथक पोहोचविणे आणि त्यानंतर पूर ओसरताच गरजू कुटुंबांपर्यंत जीवनावश्यक साहित्य पोहोचविणे, या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. एम.डी. प्रभाकरन यांच्या पुढाकारातून लायड्सने आरोग्यसेवेपासून अन्नधान्य आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंपर्यंत मदत पोहोचवून संकटग्रस्त नागरिकांना आधार दिला. नैसर्गिक आपत्तीच्या काळात केवळ मदत जाहीर न करता प्रत्यक्ष गरजेच्या ठिकाणी पोहोचून सेवा देण्याच्या या उपक्रमातून कंपनीची सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली आहे.





  Print






Related Photos