नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राअभावी अकरावीचे प्रवेश अडचणीत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
नॉन क्रिमिलेअर (एनसीएल) प्रमाणपत्राअभावी व्हीजे-एनटी, ओबीसी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश अडचणीत आले आहेत. पहिल्या गुणवत्ता यादीत नाव आल्यावर प्रवेश घ्यायला गेलेल्या विद्यार्थ्यांकडे नाँन क्रिमिलेअर प्रमाणपत्र नसल्याने काही काँलेजांनी या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला आहे. प्रवेश घेण्याची वेळ आली तरी अद्याप विद्यार्थ्यांनी एनसीएलसाठी अर्जच न केल्याने काँलेजनी त्यांना प्रवेश देण्यास नकार दिला आहे.
ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीत एक लाख १७ हजार ८८३ विद्यार्थ्याना प्रवेश मिळाला. यामधील ओबीसी, बीसी, एनटी, डीएनटी आदी राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मुंबईतील अनेक नामांकित काँलेजमध्ये प्रवेश निश्चित होऊन सुद्धा केवळ नॉन क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र नसल्याने प्रवेशास नकार दिला जात आहे. जोपर्यंत हे प्रमाणपत्र व त्यासाठीची प्रक्रिया करून कागदपत्रांची पूर्तता केली जाणार नाही, तोपर्यंत प्रवेश दिले जाणार नसल्याचा पवित्रा अनेक कॉलेजांनी घेतल्याने हे विद्यार्थी संकटात सापडले आहेत.
पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी मिळाला असून त्यात दोन सुट्टय़ा आल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. त्यातच एनसीएलसाठी अर्ज कधी करणार याची चिंता पालकांना लागली आहे.
कॉलेजमध्ये जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घेतेवेळी विद्यार्थ्यांनी एनसीएल प्रमाणपत्रासाठी अद्याप अर्ज केला नसल्याचे निदर्शनास आल्यास अशा विद्यार्थ्यांकडून कॉलेजने प्रवेश देतेवेळी हमीपत्र लिहून घ्यावे अशा सूचना शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत. पुढील ३० दिवसांत एनसीएल प्रमाणपत्र जमा न केल्यास अकरावी प्रवेश रद्द केला जाईल, असे हमीपत्र विद्यार्थ्यांकडून घेतले जाणार आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2021-08-29


Related Photos