SNDT महिला विद्यापीठात नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : विद्यार्थिनींमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने SNDT महिला विद्यापीठ, बल्लारपूर येथे नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियान अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्पंदन आणि ब्रह्माकुमारी फाउंडेशन यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाला बी.के. विनोद सर, डॉ. शमा मॅडम आणि बी.के. मीना मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थिनी व प्राध्यापकांसोबत ध्यानधारणा घेण्यात आली. ध्यानामुळे मनाची एकाग्रता वाढण्यास तसेच मानसिक ताण कमी होण्यास मदत होते, असे सांगत विद्यार्थिनींना ध्यानाचे महत्त्व समजावून देण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी व्यसनांचे शरीर, मन, कुटुंब आणि समाजावर होणारे गंभीर दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. तसेच व्यसनमुक्तीचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले.
संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना अशा जनजागृतीपर उपक्रमांची गरज अधोरेखित केली. शिक्षणासोबतच विद्यार्थिनींमध्ये सामाजिक बांधिलकी, निरोगी जीवनशैली आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीची जाणीव निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नशामुक्त जीवन जगण्याची तसेच नशामुक्त समाज निर्मितीसाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा घेतली. विद्यार्थिनी, प्राध्यापक आणि मान्यवरांच्या सहभागामुळे नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.




Petrol Price




