महत्वाच्या बातम्या

 टसर रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत जिल्हाधिकाऱ्यांची निष्टी केंद्राला भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी जिल्हा रेशीम कार्यालय, भंडारा अंतर्गत निष्टी (ता. पवनी) येथील टसर रेशीम केंद्राला भेट देऊन टसर रेशीम कीटक संगोपनाची पाहणी केली. यावेळी त्यांनी टसर रेशीम उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच टसर रेशीम उत्पादनाला चालना देण्यासाठी अंडीपुंज निर्मिती क्षमता वाढविणे आणि टसर खाद्य वृक्षांची घनता वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.

जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी निष्टी येथील टसर रेशीम केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी टसर रेशीम कीटक संगोपन प्रक्रियेची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. टसर रेशीम उत्पादनातील अडचणी, खाद्य वृक्षांची उपलब्धता तसेच उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत त्यांनी माहिती घेतली. टसर खाद्य वृक्षांची रोपवाटिका तयार करणे व वृक्ष लागवडीसाठी वनविभागाने आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी रेशीम विकास अधिकारी अनिलकुमार ढोले यांनी जिल्हाधिकारी यांना टसर रेशीम उत्पादनातील अडचणी तसेच वनविभागाशी संबंधित समस्यांची माहिती दिली. ढिवर कोसा सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत डाहारे यांनी ढिवर कोसा उत्पादकांच्या विविध मागण्या व अडचणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या.

टसर कोसा उत्पादक लाभार्थ्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी दिले. टसर रेशीम उत्पादनवाढीसाठी अंडीपुंज निर्मिती क्षमता वाढविणे, टसर खाद्य वृक्षांची घनता वाढविणे तसेच शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. सुधीर माटे, वैज्ञानिक बी (आर.एस.आर.एस.),इंगळे, क्षेत्र सहायक (बी.एस.एम.टी.सी.), ज्योती वाघमारे, वरिष्ठ तांत्रिक सहायक, जिल्हा रेशीम कार्यालय, भंडारा तसेच संबंधित कर्मचारी व टसर रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते.





  Print






Related Photos