महिला सुरक्षेसाठी दामिनी पथकाला २५ नवीन दुचाकी वाहने : जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्या हस्ते वाहनांचे हस्तांतरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : महिला व मुलींच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देतानाच महिलांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींना तात्काळ प्रतिसाद देऊन आवश्यक पोलिस मदत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दामिनी पथकांना २५ टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी वाहनांचे हस्तांतरण जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्याहस्ते करण्यात झाले.
पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आयोजित कार्यक्रमास पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, परिविक्षाधीन भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी शोभिका पाठक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे, महिला व बाल विकास अधिकारी तृप्ती चव्हाण यांच्यासह महिला पोलिस अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी महिला व मुलींना त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत मार्गदर्शन केले. तसेच सायबर गुन्ह्यांपासून बचाव, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजीबाबत आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
महिलांची सुरक्षा ही केवळ पोलिस दलाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. महिलांनी कोणत्याही प्रकारच्या त्रासाला घाबरून न जाता तात्काळ दामिनी पथकाच्या ७६२०५२००२५ किंवा पोलिस हेल्पलाईन ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी यावेळी केले.
महिला सुरक्षेच्यादृष्टीने संवेदनशील ठिकाणी गस्त वाढविणे, शाळा-महाविद्यालये, बाजारपेठा, बसस्थानके तसेच महिलांची वर्दळ असलेल्या सार्वजनिक ठिकाणी नियमित भेटी देणे आणि महिलांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेणे यासाठी या वाहनांचा उपयोग करण्यात येणार आहे. पोलिस स्टेशन वर्धा शहर, हिंगणघाट, आर्वी आणि पुलगाव येथे प्रत्येकी दोन दुचाकी वाहने, तर उर्वरित पोलिस ठाण्यांना प्रत्येकी एक दुचाकी वाहन देण्यात आले आहे. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील दामिनी पथकासाठी दोन दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
नवीन वाहनांमुळे दामिनी पथकाला आवश्यक त्या ठिकाणी जलदगतीने पोहोचणे, महिला व मुलींशी संवाद साधणे, प्राप्त तक्रारींची तात्काळ दखल घेणे तसेच छेडछाड किंवा महिलांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या घटनांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे अधिक सुलभ होणार आहे. महिला सुरक्षेबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक गस्त आणि तक्रारींना त्वरित प्रतिसाद यावरही विशेष भर देण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे जिल्ह्यातील महिला सुरक्षेच्या उपाययोजनांना अधिक गतिमानता मिळणार असून, सुरक्षित महिला-सुरक्षित समाज या उद्दिष्टाच्या दिशेने वर्धा जिल्हा पोलीस दलाने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुलगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी वंदना कारखेले यांनी केले. दामिनी पथकाच्या माधुरी वाघाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास महिला पोलिस अंमलदार, महाविद्यालयीन प्राध्यापिका व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




Petrol Price




