महत्वाच्या बातम्या

 शासकीय आयटीआयमध्ये वाहन चालक प्रशिक्षण सुरू होणार : जिल्ह्यातील पाच आयटीआयमध्ये मिळणार प्रशिक्षणाची सुविधा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षणासोबतच वाहन चालविण्याचे कौशल्य आत्मसात करता यावे, यासाठी राज्यातील १६५ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) वाहन चालक प्रशिक्षण शाळा सुरू करण्यात येणार आहेत. मेकॅनिक मोटार व्हेईकल ट्रेड असलेल्या आयटीआयमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्यासोबतच वाहन चालविण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यातील पाच आयटीआयमध्ये होणार सुरुवात -
भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखनी, लाखांदूर, पवनी आणि भंडारा या पाच शासकीय आयटीआयमध्ये मेकॅनिक मोटार व्हेईकल ट्रेड उपलब्ध असून, या संस्थांमध्ये वाहन चालक प्रशिक्षणाची सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. शासकीय आयटीआय, भंडारा या संस्थेला प्रादेशिक परिवहन कार्यालय, भंडारा यांच्यामार्फत नुकतीच मान्यता प्राप्त झाली आहे.

रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी -
मोटार वाहन प्रशिक्षण शाळेच्या माध्यमातून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. सध्या आयटीआयमध्ये शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार असून, वाहन चालविण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण माफक शुल्कात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आरटीओ मान्यतेसाठी प्रक्रिया सुरू -
जिल्ह्यातील उर्वरित शासकीय आयटीआयमध्ये वाहन चालक प्रशिक्षण शाळा सुरू करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मान्यतेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शासन स्तरावरून हा उपक्रम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मान्यता प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक सुविधा व कागदपत्रांची तपासणी करून कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे.

ड्रायव्हिंग प्रशिक्षणासाठी काय करावे लागेल? -
संबंधित आयटीआयमध्ये वाहन चालक प्रशिक्षण घेण्यासाठी आरटीओच्या पात्रता निकषांनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता, वय व निवासी पुराव्याची पूर्तता करून प्रवेशासाठी नोंदणी करावी लागणार आहे. यासंदर्भातील प्रवेश प्रक्रिया व वेळापत्रक संबंधित आयटीआयमार्फत लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

आयटीआयमध्ये कौशल्याभिमुख प्रशिक्षण, प्रशिक्षित प्रशिक्षक तसेच सुसज्ज कार्यशाळा उपलब्ध असल्याने या शासनाच्या उपक्रमातून कुशल वाहन चालक तयार होण्यास मदत होईल. परिणामी, सुरक्षित व शास्त्रशुद्ध वाहन चालविण्याच्या प्रशिक्षणामुळे रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होऊन जीवित व वित्तीय हानी टाळण्यासही मदत होईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी निलेश घोटे यांनी सांगितले.

कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तंत्रज्ञानाच्या युगात व काळाच्या गरजेनुसार वाहन चालक प्रशिक्षण सुरू करण्यात येत आहे. या प्रशिक्षणामुळे रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होऊन जिल्ह्यातील विद्यार्थी अधिक सक्षम बनतील, अशी माहिती प्राचार्य, शासकीय आयटीआय भंडारा विजय लाकडे यांनी दिली.





  Print






Related Photos