सोनिया गांधी यांनी आज देशातील १८ विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत बोलावली डिजिटल बैठक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात आता विरोधक एकत्र आले आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी  यांनी आज देशातील १८ विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत डिजिटल बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच काँग्रेस पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.
देशाला भेडसावणाऱ्या प्रमुख प्रश्नांवर विरोधी पक्षांना सोबत घेऊन सोनिया गांधी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यासाठीच त्यांनी विरोधकांची बैठक बोलावल्याचे बोलले  जात आहे. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला कठोर आव्हान देण्यासाठी तसेच मोदी सरकारवर मात करण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येत आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पेगॅसस हेरगिरी प्रकरण, शेतकरी आंदोलन आणि महागाईच्या मुद्द्यांवरुन विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. आज सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना सोनिया गांधी यांनी डिजिटल बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.  Print


News - Rajy | Posted : 2021-08-20
Related Photos