राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची घोषणा : खाद्य तेलांच्या किंमती नियंत्रणात करण्यासाठी केंद्राचे मोठे पाऊल


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
गेल्या काही दिवसांत खाद्यतेलांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या महिन्याचे बजेट कोलमडले आहे. वाढत्या खाद्यतेलांच्या किंमतींवरून सरकारला टीकेचा सामना करावा लागतोय. त्यामुळे आता खाद्यतेलांच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. देशात राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची घोषणा करण्यात आली आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची घोषणा केली आहे. या मिशनचा प्रमुख उद्देश देशात पाम तेलाचे उत्पादनाचा चालना देणे हा आहे. या मिशनसाठी 11 हजार कोटी रुपयांचा खर्च येणे अपेक्षित आहे. भारतात तेलबियांचे उत्पादन कमी आहे. या प्रकारच्या पिकांना चालना देणे, उत्पादन वाढवणे आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा या मिशनचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने कृषी मंत्रालयाला अशी योजना बनण्यासाठी सांगितले होते ज्यामुळे येत्या काही वर्षात खाद्य तेलांच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण होऊ शकेल आणि खाद्यतेलांची आयात करण्याची गरज पडणार नाही, त्यानंतर राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची आखणी करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, देशात पामतेलाचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना सर्व सुविधा पुरवल्या जाणार आहेत. चांगल्या दर्जाची बियाणं, टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना दिली जाईल. ईशान्येकडील राज्यांमध्ये पामतेलाची शेती सुरू करण्यात आली आहे. याआधीही दाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेत.
भारतात पामतेल आणि सोयाबिन तेल सर्वात जास्त आयात केलं जातं. आयात केल्या जाणाऱ्या तेलामध्ये पाम तेलाचं प्रमाण 40 तर सोयाबिन तेलाचं प्रमाण 33 टक्के आहे. पाम तेल उत्पादनात इंडोनेशिया जगात पहिल्या क्रमांकावर आहे तर त्याखालोखाल मलेशियाचा नंबर लागतो. काही आफ्रिकन देशांमध्येही पाम तेलाचं उत्पादन घेतलं जातं. भारत या देशांकडून पाम तेलाची आयात करतं. यासोबतच, सर्वाधिक सोयाबिन तेल हे अर्जेंटिना आणि ब्राझिलमधून आयात केलं जातं. भारत वर्षाला 90 लाख टन पाम तेल आयात करतं. सूर्यफूलाचं तेल सर्वाधिक युक्रेनमधून आयात केलं जातं. त्यामुळे देशांतर्गत पाम तेल उत्पादनाला चालना देण्यासाठी पाऊलं उचलली जात आहेत.
मागच्या 20 वर्षांत देशात जेवणात रिफाईंड तेलांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भारताची लोकसंख्या दरवर्षी सरासरी अडीच कोटींनी वाढते. या हिशोबाने खाद्य तेलची मागणी दरवर्षी 3 ते 3.5 टक्के वाढत असल्याचा अंदाज आहे. सध्या भारत एका वर्षात 60 ते 70 हजार कोटी रुपये खर्च करून 1.5 कोटी टन खाद्य तेल खरेदी करतं. देशाच्या लोकसंख्येनुसार भारताला दरवर्षी साधारण अडीच कोटी टन खाद्यतेलाची गरज आहे. (
पाम तेल एकप्रकारचं वनस्पती तेल आहे. ताडाच्या झाडाच्या बियांपासून पाम तेल काढलं जातं. या तेलाला कसल्याही प्रकारचा वास नसतो. त्यामुळे स्वयंपाकात हे तेल वापरलं जातं. जगभरात याचा वापर केला जातो. परदेशातून आयात केलेल्या पाम तेलाचा उपयोग देशातल्या अनेक उद्योगांमध्ये केला जातो. याशिवाय देशांतर्गत उत्पादन होणाऱ्या इतर तेलांमध्येही पाम तेल मिसळलं जातं.
हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये खाद्यतेलांमध्ये पाम तेल मोठ्या प्रमणात वापरलं जातं. याशिवाय अनेक उद्योगांमध्येही पाम तेलाचा वापर होतो. अंगासाठी वापरात येणाऱ्या साबणांच्या निर्मितीमध्येही पाम तेलाचा वापर होतो. पाम तेलात सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे चॉकलेट-टॉफी बनवण्यातही पामतेलाचा वापर केला जातो. सध्या जगभरात जवळपास 8 कोटी टन पाम तेलाची निर्मिती केली जाते.  Print


News - World | Posted : 2021-08-09
Related Photos