अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा महामोर्चा १५ डिसेंबर रोजी विधान भवनावर धडकणार
- १५ डिसेंबर रोजी नागपूरला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा महामोर्चा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, वेतनश्रेणी, ग्रॅच्युइटी, मासिक पेन्शन, दरम्यानच्या कालावधीत मानधनात २६ हजार व २० हजार अशी भरीव वाढ, महागाई भत्ता, अंगणवाडी आहाराच्या दरात वाढ, भाड्यामध्ये निकष शिथिल करून भरीव वाढ आदी न्याय्य मागण्यांसाठी ४ डिसेंबर पासून बेमुदत संपावर उतरलेल्या अंगणवाडी कर्मचारी १५ डिसेंबर रोजी नागपूर येथील विधानसभा सत्रावर महामोर्चा काढणार आहेत.
या मोर्चात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील हजारो महिला कर्मचारी सहभागी होणार आहेत. नागपूर आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमधील कर्मचारी ४ डिसेंबर पासून त्या ठिकाणी रोज ठिय्या आंदोलन करतच आहेत. या आंदोलनाचे रुपांतर या महामोर्चात होणार आहे. १५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता हजारो महिला कर्मचारी बालभवन, शुक्रवारी तलाव येथे जमतील व विधानसभेच्या दिशेने कूच करतील. तिथे पोहोचल्यावर या महामोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर होऊन शासनाने निमंत्रित केल्यास कृती समितीचे शिष्टमंडळ चर्चा करण्यासाठी विधान भवनात जाईल. मागण्या मान्य झाल्याशिवाय हा संप आणि आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने केला आहे.
या मोर्चाचे नेतृत्व शुभा शमीम, चंदा मेंढे, दिलीप उटाणे, सूर्यमणी गायकवाड, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, सुवर्णा तळेकर, जयश्री पाटील आदी कृती समितीचे नेते करणार आहेत.
News - Nagpur