महत्वाच्या बातम्या

 जुनोना जंगलात पुन्हा वन्यजीव अपघात; रेतीवाहू हायवाच्या धडकेत सांबर गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

जिल्हा प्रतिनिधी/चंद्रपूर :जुनोना - चिचपल्ली मार्गावरील वन्यजीव अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसतानाच शनिवारी सकाळी पुन्हा एक गंभीर घटना घडली. आज सकाळी सुमारे ६ वाजताच्या दरम्यान रेती वाहून नेणाऱ्या हायवा ट्रकने एका सांबराला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सांबर गंभीररित्या जखमी झाले असून त्याचा जबडा पूर्णपणे तुटला आहे. तसेच उजव्या मांडीचा भाग व मान रस्त्यावर घासल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू होता. अपघातात सांबराचे मागील दोन्ही पायही तुटल्याने त्याच्या बचावाची शक्यता अत्यंत कमी असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक ४८८ मधील जंगल परिसरात, बाबूपेठ-जुनोना मार्गावर घडली. जखमी सांबराला पुढील उपचारासाठी ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे. जुनोना जंगल परिसरात गेल्या काही महिन्यांत वन्यजीव अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. मार्च महिन्यात जुनोना-चिचपल्ली मार्गावर एका बिबट्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसांतच पहाटेच्या सुमारास एका मोठ्या नर चितळाचाही अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता.या रस्त्याच्या रुंदीकरणाला हॅबिटॅट कंझर्व्हेशन सोसायटीने पूर्वीपासून विरोध दर्शविला होता. संस्थेच्या मते, जुनोना जंगल हा वन्यजीवांचा महत्त्वाचा भ्रमणमार्ग असून येथे वाघ, अस्वल, बिबट, चितळ, सांबर, रानमांजर, मसण्या ऊंद, विविध सरीसृप यांची मोठ्या प्रमाणावर हालचाल असते. रस्त्याची रुंदी वाढल्यामुळे वाहनांचा वेग वाढून वन्यजीवांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा संस्थेने दिला होता.संस्थेने सार्वजनिक बांधकाम विभागाला स्पीड ब्रेकर, बॉक्स कलवर्ट यांसारख्या उपाययोजना करण्याची तसेच संध्याकाळी ६ नंतर हा मार्ग बंद ठेवण्याची मागणी केली होती. मात्र, केवळ तोंडी आश्वासने देत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. परिणामी आता वन्यजीवांना त्याची मोठी किंमत मोजावी लागत असल्याचा आरोप हॅबिटॅट कंझर्व्हेशन सोसायटीने केला आहे.नुकत्याच झालेल्या बिबट अपघातानंतरही संस्थेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विवेक अंबुले यांना वारंवार निवेदने देण्यात आली होती. मात्र त्यास अद्याप कोणतेही उत्तर मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. “एखाद्या वाघाचा अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का?” असा सवालही संस्थेच्या सदस्यांनी उपस्थित केला. घटनेची माहिती हॅबिटॅट कंझर्व्हेशन सोसायटीचे सदस्य अनिकेत वनकर यांनी वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिली. माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली.

घटनास्थळी हॅबिटॅट कंझर्व्हेशन सोसायटीचे सदस्य यश निखारे, कल्पित सोरते, अंकित बाकडे तसेच वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मेश्राम, वनरक्षक आर. डी. पायपरे, कांबळे आणि वनमजूर उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos