महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रहितासाठी प्रत्येक जागृत मतदारांचे आपले मत नोंदविणे आवश्यक : राहुल कर्डिले


-  राष्ट्रीय मतदार दिन समारंभ
- मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : लोकशाहीत मतदानाला फार मोठे महत्व आहे. त्यामुळे प्रत्येकाने राष्ट्रहितासाठी आपले नाव मतदार यादीत नोंदवून मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय व यशवंत महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने यशवंत महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाचे कुलपती रजनिशकुमार शुक्ल, सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्र बेले, तहसिलदार रमेश कोळपे आदी उपस्थित होते. भारत जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. देशामध्ये कोणतेही सामाजिक अथवा आर्थिक प्रश्न निकाली काढण्यासाठी बहुमताची आवश्यकता असते. यासाठी मतदान प्रक्रिया ही महत्वाची आहे. त्यामुळे संविधानाने प्रत्येक 18 वर्षावरील नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार दिला आहे. यासाठी प्रत्येक मतदारांनी आपल्या हक्काची जाणीव ठेऊन प्रत्येक निवडणूकीत मतदान करावे व मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले. वय वर्ष 18 पूर्ण झालेल्या युवकांनी आपले नाव मतदार यादी नोंदविण्याचे आवाहनही यावेळी राहुल कर्डिले यांनी केले. मुख्य अतिथी म्हणून बोलतांना महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्ल म्हणाले की, आम्हा भारतीयांना मतदानाचा अधिकार सहजतेने मिळाला असून आपण त्याचा वापर केला पाहिजे. भारत ही लोकशाहीची जननी आहे. बुद्धाच्या काळात गणतंत्र ही पद्धत होती. आपण पूर्वापार चालत आलेल्या या पद्धतीसाठी पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन विवेकशील मतदान केले पाहिजे. विद्यार्थी हे भारताचे भविष्य असून जगाचे नेतृत्व करणारा भारत घडवण्यासाठी त्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घ्यावा, असे आवाहनही प्रो. शुक्ल यांनी केले. शासनाला उत्कृष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता असते. याकरीता स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करुन प्रशासकीय अधिकारी बनून आपले भविष्य उज्वल करावे, असे विनायक महामुनी म्हणाले. यावेळी विवेक देशमुख, रविंद्र बेले, सुरेश बगळे, प्रविण महिरे यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय मतदार दिना निमित्त महाविद्यालया मार्फत घेण्यात आलेल्या निबंध, वक्तृत्व, रांगोळी, गीत गायन स्पर्धेतील विजेत्यांसह शिक्षकांना प्रशस्तीपत्र व सन्माचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी अनिकेत समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती विषयावर पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाला विविध महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला नायब तहसिलदार भगवान वनकर, अतुल रासपायले आदी उपस्थित होते.

  Print


News - Wardha
Related Photos