महत्वाच्या बातम्या

 महिला शेतकरी प्रमाणपत्रामुळे महिलांना शासकीय योजनांचा लाभ सुलभरित्या मिळणार : संचालक आशा पठाण


- महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी प्रादेशिक कार्यशाळेत मार्गदर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : महिला शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रमाणपत्रामुळे त्यांची अधिकृत ओळख निर्माण होणार असून विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांना सुलभरित्या घेता येईल. या माध्यमातून कृषी उत्पादन, पोषण सुरक्षा आणि शाश्वत शेतीमध्ये सकारात्मक सुधारणा घडून येण्यास मदत होईल, असे प्रतिपादन वनामतीच्या संचालक आशा पठाण यांनी केले. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ व महिला किसान दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वनामती येथे प्रादेशिक कार्यशाळा व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन वनामतीच्या संचालिका श्रीमती आशा पठाण यांनी केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यशाळेत महिला शेतकऱ्यांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण साधण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.

 विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाडगे, आत्माचे प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू, आत्माच्या प्रकल्प उपसंचालक पल्लवी तलमले, पोषण तज्ज्ञ डॉ रेणुका मायंदे, कृषी शास्त्रज्ञ डॉ. सरिता मोवाडे, प्रगतिशील महिला शेतकरी सुनिता वाधवा यावेळी उपस्थित होते. उमेश घाडगे यांनी महिला शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन, रेशीम उद्योग आणि कृषी प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचे प्रयत्न करण्यासाठी मार्गदर्शन केले. डॉ. रेणुका मायंदे यांनी महिलांचे आरोग्य, रक्तक्षय प्रतिबंध व स्थानिक पौष्टिक अन्नघटकांच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. कृषी शास्त्रज्ञ डॉ. सरिता मोवाडे यांनी जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी सेंद्रिय कर्ब वाढविणे, जैविक निविष्ठांचा वापर आणि पीक फेरपालटीचे महत्त्व सांगितले.

 प्रास्ताविकात डॉ. अर्चना कडू यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासोबतच महिला शेतकऱ्यांच्या उत्पादनांचे ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि थेट बाजारपेठेशी जोडणी करण्यासाठी आत्मा यंत्रणा प्रयत्नशील असल्याचे सांगितले. प्रगतिशील महिला शेतकरी सुनीता वाधवा यांनी नैसर्गिक शेती व शेतमाल प्रक्रिया उद्योगातील आपले अनुभव कथन केले. नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रगतिशील महिला शेतकऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. कार्यक्रमात महिला बचत गटांनी तयार केलेल्या सेंद्रिय उत्पादनांचे, हस्तकलेचे आणि प्रक्रियायुक्त पदार्थांचे प्रदर्शन व विक्री स्टॉल्स हे विशेष आकर्षण ठरले.  कार्यक्रमास कृषी विभागाचे अधिकारी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंत्र अधिकारी शुभांगी कामडी यांनी केले व आभार वैशाली पाटील यांनी मानले.





  Print






Related Photos