राजुरा–आसिफाबाद मार्गावर ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू : एक जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : बकऱ्यांसाठी चारा आणण्याच्या निमित्ताने मित्रासोबत राजुरा येथे गेलेल्या तरुणावर गावाकडे परतताना काळाने घाला घातला. राजुरा–आसिफाबाद मार्गावरील सुमठाणा फाट्याजवळ नाल्याच्या पुलावर अज्ञात ट्रकने मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सुरेश वीरय्या येगेवार यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला रमेश ऊर्फ समीर प्रभाकर वेलादी (२२) हा जखमी झाला. २७ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला.
बेडी भेंडाळा नवीन वस्ती, ता. राजुरा येथील रहिवासी सुरेश येगेवार हे मेंढ्या व बकऱ्या राखण्याचे काम करीत होते. २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्यांनी रमेश वेलादी याला सोबत घेऊन राजुरा येथे जाण्याचे ठरविले. बकऱ्यांसाठी चारा आणण्याच्या उद्देशाने दोघेही सुरेश यांच्या मोटारसायकलने राजुरा येथे गेले. मात्र, चारा महाग असल्याने त्यांनी तो खरेदी केला नाही. सुरेश यांनी स्वतःसाठी दोन बर्मुडा खरेदी केले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत राजुरा येथे थांबून दोघेही गावाकडे परतण्यासाठी निघाले.
गाव आता जवळ आले होते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. रात्री ११ वाजताच्या सुमारास सुमठाणा फाट्याच्या पुढे राजुरा–आसिफाबाद मार्गावरील नाल्याच्या पुलाजवळ रस्त्याच्या एका बाजूला बांधकाम सुरू होते. त्यामुळे वाहतूक दुसऱ्या बाजूने सुरू होती. रस्त्यावर गिट्टी आणि माती पडून असतानाच आसिफाबादकडून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांच्या एमएच ३४ बीएक्स ७६६४ क्रमांकाच्या मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही रस्त्यावर कोसळले.
या अपघातात रमेश याच्या उजव्या हाताला आणि डाव्या पायाला किरकोळ दुखापत झाली; मात्र सुरेश यांना गंभीर अंतर्गत दुखापत झाली. अपघातानंतर ट्रकचालक मदतीसाठी न थांबता वाहनासह पसार झाला. काही वेळाने तेथून जाणाऱ्या नागरिकांनी जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावरील सुरक्षा रक्षकांनी वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर डायल ११२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवेला पाचारण करण्यात आले.
माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी सुरेश यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, राजुरा येथे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. काही वेळापूर्वी सोबत असलेला मित्र डोळ्यांसमोर मृत्यूशी झुंज देत असताना त्याला वाचविण्याचे प्रयत्न झाले; परंतु त्याचा जीव वाचू शकला नाही. या घटनेने अपघातातील जखमी रमेश यालाही मोठा मानसिक धक्का बसला असण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी रमेश वेलादी याच्या तोंडी रिपोर्टवरून अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अपघात करून घटनास्थळावरून पसार झालेल्या ट्रकचालकाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख करीत आहेत.




Petrol Price




