स्क्रॅप टू स्मार्ट-२०२६मध्ये BIT-ITI च्या फिटर ट्रेडचा प्रथम क्रमांक : टाकाऊ वस्तूंतून साकारला भारताचा नकाशा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : टाकाऊ पासून टिकाऊ या संकल्पनेतून पर्यावरण संरक्षण, कचरा व्यवस्थापन आणि टाकाऊ वस्तूंच्या पुनर्वापराचा संदेश देणाऱ्या स्क्रॅप टू स्मार्ट-२०२६ या पोस्टर मेकिंग व मॉडेल प्रदर्शन स्पर्धेत बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (BIT) येथील ITI च्या फिटर ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांनी भारताच्या नकाशाची आकर्षक प्रतिकृती साकारत प्रथम क्रमांक पटकाविला.
BIT च्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने विभागप्रमुख प्रा. प्रशांत वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली ९ ऑक्टोबर २०२६ रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. समाजात टाकाऊ वस्तूंचा योग्य वापर, पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या स्पर्धेत तब्बल १५५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
टाकाऊ वस्तूंचा कल्पकतेने वापर करून उपयुक्त व आकर्षक कलाकृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत BIT-ITI च्या फिटर ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या कौशल्याची चमक दाखविली. ट्रेड निदेशक आशिष वंगलवार आणि दीपक निवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थ्यांनी टाकाऊ साहित्यापासून भारताच्या नकाशाची प्रतिकृती तयार केली. त्यांच्या या नाविन्यपूर्ण सादरीकरणाला प्रथम क्रमांक मिळाला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय वासाडे, संचालक डॉ. रजनीकांत मिश्रा, ITI चे प्राचार्य जाहिद अन्सारी, पॉलिटेक्निकचे प्राचार्य श्रीकांत गोजे, डीन डॉ. झेड. जे. खान, डॉ. सत्यनारायण चंगाला तसेच आयोजन समितीतील सर्व सदस्यांनी विजेत्या प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
टाकाऊ वस्तूंकडे केवळ कचरा म्हणून न पाहता त्यातून नवनिर्मितीची संधी शोधता येते, हा संदेश या स्पर्धेतून देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि तांत्रिक कौशल्याला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.




Petrol Price




