सोनेगावात चोरट्यांचा धुमाकूळ : तीन घरांमध्ये हात साफ


- एकाच रात्री पाच घरांना लक्ष्य; ३९ हजार २५० रुपयांचा ऐवज लंपास
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : चोरट्यांनी आता शहरांसोबतच ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळविल्याचे दिसून येत आहे. सोनेगाव (स्टेशन) येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री तब्बल पाच घरांना लक्ष्य केले. यापैकी तीन घरांमध्ये चोरी करण्यात चोरट्यांना यश आले, तर दोन घरांमध्ये काहीही हाती न लागल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. या घटनेत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३९ हजार २५० रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनेगाव (स्टेशन) येथील मनोज रामेश्वर चौधरी यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून चांदीचा गोफ तसेच लहान बाळाच्या सोन्याच्या मनगट्या लंपास केल्या. त्यानंतर रामदास नरसुजी गुरनुले यांच्या घरात चोरी करून एक ग्रॅम सोने चोरून नेले.
चोरट्यांनी महेंद्र वाल्मिक पवार यांच्या घरालाही लक्ष्य केले. त्यांच्या घरातून सोन्याचे २० मणी, पाच ग्रॅम वजनाचे पदक आणि रोख आठ हजार रुपये असा ऐवज चोरीस गेला. या तिन्ही घरांमधून चोरीस गेलेल्या ऐवजाची एकूण किंमत ३९ हजार २५० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
याच रात्री चोरट्यांनी हरीश काळे तसेच आणखी एका घरात प्रवेश केला. मात्र, या दोन्ही घरांमध्ये त्यांच्या हाती कोणताही मौल्यवान ऐवज लागला नाही. त्यामुळे या घरांमधून चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. एकाच रात्री गावातील पाच घरांना लक्ष्य करण्यात आल्याने सोनेगाव परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पुलगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी वंदना कारखेले, प्रभारी ठाणेदार पद्माकर मुंढे, सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्षा तांदूळकर आणि जमादार रवी वर्मा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, चोरीच्या घटनेबाबत आवश्यक माहिती संकलित केली आहे.
एकाच रात्री पाच घरांना लक्ष्य केल्याने परिसरात सराईत चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे का, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, तसेच गावातील रात्रीची पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अल्लीपूर पोलिस करीत असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी विविध दिशेने तपास सुरू आहे.




Petrol Price




