बल्लारपूरमध्ये बेटी बचाव-बेटी पढाव व पोषण आहार सप्ताहाची उत्साहात सांगता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत बेटी बचाव, बेटी पढाव तसेच पोषण आहार सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी बल्लारपूर येथील साईबाबा सभागृहात करण्यात आले. नागरी एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या वतीने तसेच जिल्हा महिला व बालविकास कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, रेल्वे चाइल्ड लाईन आणि पंचायत समिती बल्लारपूरच्या संरक्षण अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमातून महिला सक्षमीकरण, बालकांचे संरक्षण, मुलींचे शिक्षण, महिला व बालकांचे पोषण आणि विविध शासकीय योजनांविषयी जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बल्लारपूरचे नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले, नागरी एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे अधिकारी दामोधर कुमरे, पंचायत समितीच्या संरक्षण अधिकारी परवीन शेख, ॲड. संदेश हस्ते, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रुतिका पावडे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या कल्पना राजुरकर, अंगणवाडी पर्यवेक्षिका सृष्टी रिंगणे, रेल्वे चाइल्ड लाईनच्या पर्यवेक्षिका बबीता लोहकरे आणि चाइल्ड लाईनचे केस वर्कर धर्मेंद्र मेश्राम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. अंगणवाडी सेविका वनिता नागराळे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
ॲड. संदेश हस्ते यांनी महिलांना विविध कायदे आणि त्यांना मिळणाऱ्या कायदेशीर संरक्षणाविषयी मार्गदर्शन केले. नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले यांनी महसूल विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देत महिलांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या कल्पना राजुरकर यांनी बालकांच्या संरक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजना, दत्तक योजना, अनाथ प्रमाणपत्र योजना तसेच लाभार्थ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीविषयी माहिती दिली. महिला व बालकांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर गरज पडल्यास संबंधित यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. श्रुतिका पावडे यांनी महिला व बालकांच्या आरोग्यासाठी संतुलित आणि सकस आहाराचे महत्त्व विशद केले. बालकांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी पोषणमूल्यांनी समृद्ध आहार आवश्यक असून, लहान मुलांना फास्ट फूड देणे टाळावे, असे त्यांनी सांगितले. घरगुती आणि पौष्टिक आहारातून बालकांना आवश्यक पोषण मिळते, याकडे पालकांनी विशेष लक्ष द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंचायत समितीच्या संरक्षण अधिकारी परवीन शेख यांनी महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम, २००५ याविषयी सविस्तर माहिती दिली. महिलांना अन्याय आणि कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागल्यास उपलब्ध कायदेशीर मदत व संरक्षण यंत्रणांचा उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच बालसंगोपनासंदर्भातील योजनांची माहितीही त्यांनी दिली.
रेल्वे चाइल्ड लाईनच्या पर्यवेक्षिका बबीता लोहकरे यांनी बेटी बचाव, बेटी पढाव अभियानाचे महत्त्व स्पष्ट केले. किशोरवयीन मुलींच्या शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक विकासासाठी कुटुंबात व समाजात पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. मुलींना प्रत्येक क्षेत्रात समान संधी मिळाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. तसेच अल्पवयीन मातृत्वाचे आरोग्यावर होणारे परिणाम, बालविवाह रोखण्यासाठी अंगणवाडी सेविकांची भूमिका आणि बालकांना गुड टच व बॅड टच यातील फरक समजावून सांगण्याचे महत्त्व याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
चाइल्ड लाईनचे केस वर्कर धर्मेंद्र मेश्राम यांनी काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी चाइल्ड लाईनच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती दिली. बालकांना मदतीची गरज भासल्यास १०९८ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच बालकल्याण समितीची भूमिका, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मदतीसाठी उपलब्ध असलेले सखी वन स्टॉप सेंटर आणि त्याअंतर्गत महिलांना व मुलींना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा यांची माहिती दिली. महिलांच्या मदतीसाठी असलेल्या १८१ या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकाचे महत्त्वही त्यांनी विशद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे अधिकारी दामोधर कुमरे यांनी अंगणवाडी सेविकांच्या कार्याची माहिती देत बालकांच्या सर्वांगीण विकासात आणि पोषण आहाराच्या अंमलबजावणीत त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. अंगणवाडी पर्यवेक्षिका सृष्टी रिंगणे यांनी अंगणवाडी सेविकांच्या कामाचा आढावा घेतला. त्यांनी आपल्या अनुभवांतून अंगणवाडी सेविकांची जबाबदारी आणि समाजातील त्यांचे योगदान स्पष्ट केले.
कार्यक्रमादरम्यान अंगणवाडी सेविकांनी बेटी बचाव, बेटी पढाव या विषयावर पथनाट्य सादर करून मुलींच्या शिक्षणाचा आणि संरक्षणाचा संदेश दिला. तसेच पोषण आहाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी एकांकिकाही सादर करण्यात आली. या सादरीकरणांतून उपस्थितांना मुलींचे अधिकार, बालकांचे संरक्षण आणि सकस आहाराचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
यावेळी दोन मुलींच्या संगोपनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या कुटुंबांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. तसेच एकल पालक महिलेलाही प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमातून मुलींच्या संगोपनाला प्रोत्साहन देण्यासोबतच एकल पालक महिलांच्या प्रयत्नांना पाठबळ देण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन अंगणवाडी सेविका मेघा रिंगणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अंगणवाडी सेविका कुंदा पावडे यांनी केले. महिला सक्षमीकरण, बालसंरक्षण, मुलींचे शिक्षण आणि पोषण आहाराविषयी जनजागृती करणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.




Petrol Price




