महत्वाच्या बातम्या

 अनुदानित शाळेतील शिक्षकेतर भरतीचा मार्ग मोकळा : ८० टक्के रिक्त पदे भरणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा रखडलेला मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य सरकारने कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहायक या तीन संवर्गांतील रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली असून, ८० टक्के रिक्त पदांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. लिपिक आणि प्रयोगशाळा सहायकांच्या जवळपास ३० हजार मंजूर पदांपैकी २३ हजारांहून अधिक पदे भरण्याचा मार्ग या निर्णयामुळे खुला झाला आहे.

शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती २०१२ पासून बंद होती. त्यानंतर शिक्षकांची भरती टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली; मात्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाले. परिणामी शाळांमधील प्रशासकीय कामकाजावर त्याचा परिणाम होत होता. तब्बल १४ वर्षांनंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया सुरू होणार असल्याने पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तीन संवर्गातील पदांना प्राधान्य -
खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहायक या संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. त्यापैकी कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहायकांच्या ८० टक्के रिक्त पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. उपलब्ध मंजूर पदांपैकी किती पदे प्रत्यक्षात रिक्त आहेत, हे संचमान्यतेनुसार निश्चित केले जाणार आहे.

पात्रता व वयोमर्यादा शासनाच्या नियमानुसार -
प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, संगणक ज्ञान, अनुभव, व्यावसायिक पात्रता तसेच वयोमर्यादा शासनाच्या विद्यमान नियमांनुसार निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी संबंधित पदासाठीच्या अधिकृत जाहिरातीची आणि शासनाच्या नियमांची माहिती घेणे आवश्यक ठरणार आहे.

सुरुवातीची तीन वर्षे मानधनावर नियुक्ती -
निवड झालेल्या उमेदवारांची सुरुवातीची तीन वर्षे मानधनावर नियुक्ती करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर शासनाच्या नियमांनुसार सेवा अटी लागू होणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी नियुक्तीपूर्वी मानधन, वेतन, सेवाशर्ती तसेच तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरची सेवा-स्थिती याबाबतच्या शासन निर्णयाचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया -
भरती प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी संबंधित संवर्गाची बिंदुनामावली मागासवर्ग कक्षाकडून तपासून घेणे अनिवार्य राहणार आहे. प्रमाणित बिंदुनामावली आणि जाहिरातीच्या नमुन्यासह संबंधित प्रस्ताव शिक्षणाधिकारी किंवा विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे सादर करावा लागणार आहे.

यासोबतच सुधारित आकृतिबंधानुसार संपुष्टात येणारी पदे, अतिरिक्त पदे तसेच समायोजनासंदर्भातील कार्यवाही पूर्ण झाली आहे किंवा नाही, याचीही तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर संचमान्यतेच्या आधारे संबंधित शाळेतील मंजूर, कार्यरत आणि प्रत्यक्ष रिक्त पदांची संख्या निश्चित केली जाईल. त्यामुळे प्रत्येक शाळेतील पदसंख्या आणि प्रत्यक्ष भरतीची संख्या वेगवेगळी असण्याची शक्यता आहे.

नागपूर जिल्ह्यात सुमारे ४०० पदे भरण्याची शक्यता -
नागपूर जिल्ह्यातील ८१९ अनुदानित शाळांमध्ये कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहायकांची जवळपास ४०० पदे भरली जाण्याची शक्यता आहे. मात्र, कनिष्ठ महाविद्यालय जोडून असलेल्या शाळा-महाविद्यालयांच्या संचमान्यतेचा प्रश्न अद्याप कायम आहे. त्यामुळे अशा संस्थांमधील रिक्त पदांची अंतिम संख्या निश्चित करताना संबंधित संचमान्यतेचा विचार केला जाणार आहे.

प्रथम पदोन्नती, त्यानंतर अनुकंपा नियुक्ती -
रिक्त पदे भरण्यापूर्वी प्रथम पदोन्नतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. नियमित नियुक्तीने कार्यरत आणि पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपलब्ध असल्यास त्यांना नियमानुसार पदोन्नती देण्यात येईल. पदोन्नतीनंतरही पदे रिक्त राहिल्यास उपलब्ध नियमानुसार अनुकंपा नियुक्तीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित पदांसाठी भरती प्रक्रिया पुढे नेली जाईल.

हजारो उमेदवारांना संधीची प्रतीक्षा -
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती अनेक वर्षांपासून रखडल्याने पात्र उमेदवार मोठ्या संधीच्या प्रतीक्षेत होते. आता शासनाने भरतीला मंजुरी दिल्याने या उमेदवारांच्या आशा पुन्हा जाग्या झाल्या आहेत. भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने, कोणताही विलंब न करता आणि निश्चित वेळापत्रकानुसार पूर्ण करावी, अशी अपेक्षा उमेदवारांकडून व्यक्त होत आहे.





  Print






Related Photos