महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध होणार


- दावे व हरकतींसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत
-  जिल्ह्यातील 2066 मतदान केंद्रांना निवडणूक आयोगाची अंतिम मंजुरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे. या प्रारूप मतदार यादीत, जिल्ह्यातील एकूण १५ लाख २७ हजार ५०२ मतदारांचा समावेश आहे. नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासून आवश्यक दावे व हरकती ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने चंद्रपूर जिल्ह्यात एकूण २०६६ मतदान केंद्रांना अंतिम मंजुरी दिली आहे. यामध्ये १३ मतदान केंद्रे विलीन अथवा रद्द करण्यात आली असून ३ नवीन मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. मतदान केंद्रांची संपूर्ण यादी जिल्हा प्रशासनाच्या chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रारूप यादीत १५ लाखांवर मतदार : प्रारूप मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकूण१५ लाख २७ हजार ५०२ मतदार आहेत. त्यामध्ये ७ लाख ८० हजार ५०५ पुरुष, ७ लाख ४७ हजार २२ महिला आणि २४ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय पाहता राजुरा मतदारसंघात २ लाख ७२ हजार ८५० मतदार, चंद्रपूर मतदारसंघात २ लाख ५९ हजार ४४४ मतदार, बल्लारपूर मतदारसंघात २ लाख ४६ हजार ५९५ मतदार, ब्रम्हपुरी मतदारसंघात २ लाख ५१ हजार १२९ मतदार, चिमूर मतदारसंघात २ लाख५८ हजार ७६९ मतदार तर वरोरा मतदारसंघात २ लाख 38 हजार ७६४ मतदारांचा समावेश आहे.

२ लाख ७० हजार १५३ अनकलेक्टेबल मतदारांची यादी उपलब्ध : विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत गृहभेटीदरम्यान मृत, कायमस्वरूपी स्थलांतरित, गैरहजर अथवा सापडू न शकलेले, दुबार किंवा अन्यत्र नोंदणी असलेले अशा एकूण २ लाख ७० हजार १५३ मतदारांची स्वतंत्र यादी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे तसेच जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यामध्ये ५१ हजार ९१३ मृत,१ लाख ६२ हजार८४४ कायमस्वरूपी स्थलांतरित २८ हजार ५३२ गैरहजर अथवा सापडू न शकलेले, २५ हजार ६२३ दुबार किंवा अन्यत्र नोंदणी असलेले आणि १ हजार २४१ इतर मतदारांचा समावेश आहे.

दावे व हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत संधी : नागरिकांना प्रारूप मतदार यादीसंदर्भातील दावे व हरकती ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे सादर करता येतील. प्राप्त दावे व हरकतींची मतदार नोंदणी अधिकारी चौकशी करून कायदेशीर तरतुदीनुसार निर्णय घेतील. ईआरओ च्या निर्णयाविरोधात अपीलाचीही तरतूद : लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५० च्या कलम २४ अंतर्गत ईआरओ यांच्या निर्णयामुळे बाधित झालेल्या नागरिक अथवा मतदाराला अपील करण्याचा अधिकार आहे. ईआरओ यांच्या निर्णयाविरोधात १५ दिवसांच्या आत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे प्रथम अपील दाखल करता येईल.


प्रथम अपीलावरील निर्णयाबाबत समाधान न झाल्यास त्या निर्णयाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे द्वितीय अपील दाखल करता येईल. नागरिकांनी मतदार यादीत नाव तपासावे : जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव व तपशील काळजीपूर्वक तपासावेत. नाव समाविष्ट करणे, तपशिलात दुरुस्ती किंवा अन्य कोणतीही हरकत असल्यास निर्धारित कालावधीत संबंधित मतदान नोंदणी अधिकारी (ईआरओ) किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे दावा अथवा हरकत सादर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.





  Print






Related Photos