पांदन रस्त्याची दुरवस्था : शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा मार्ग झाला खडतर


- गुडघाभर चिखल-पाण्यातून शेत गाठण्याची वेळ; कळमगाव तुकूम येथील पांदन रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : तालुक्यातील कळमगाव तुकूम ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शेतशिवारात जाणाऱ्या पांदन रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पावसामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने शेतकऱ्यांना गुडघाभर चिखल आणि पाण्यातून वाट काढत शेत गाठावे लागत आहे. त्यामुळे शेतीच्या दैनंदिन कामांसाठी ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
कळमगाव तुकूम शेतशिवारात जाण्यासाठी असलेला हा पांदन रस्ता परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतीसाठी लागणारी अवजारे, खते, बियाणे तसेच इतर आवश्यक साहित्य शेतापर्यंत नेण्यासाठी आणि शेतमाल गावात आणण्यासाठी याच रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, पावसाळ्यात रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की, साधे पायदळ चालणेही शेतकऱ्यांसाठी आव्हान ठरत आहे.
गुडघाभर चिखलातून शेत गाठण्याची वेळ -
पावसामुळे पांदन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून, ठिकठिकाणी पाणी साचले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी भरल्याने खड्ड्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे शेतात जाताना शेतकऱ्यांचे पाय घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. अनेकदा चिखलात पाय रुतल्याने शेतकऱ्यांना अक्षरशः कसरत करावी लागते. गुडघाभर पाण्यातून वाट काढत आणि गुडघाभर चिखलात पाय रुतवत शेत गाठण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अशा परिस्थितीत पायात काटा किंवा एखादी वस्तू टोचल्यास होणाऱ्या वेदना वेगळ्याच. शेतीची कामे करण्यासाठी दररोज अशा बिकट परिस्थितीतून मार्ग काढावा लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
शेतीची कामे वेळेत करणे अडचणीचे -
शेतकऱ्यांसाठी पावसाळा हा शेतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा काळ असतो. या काळात पेरणी, खते देणे, तण काढणे, पिकांची पाहणी आणि इतर अनेक कामे वेळेत करणे आवश्यक असते. मात्र, पांदन रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर शेतात पोहोचणेही कठीण झाले आहे. शेतीची अवजारे व साहित्य ने-आण करतानाही मोठ्या अडचणी येत आहेत. रस्ता वाहतुकीस योग्य नसल्याने चारचाकी अथवा इतर वाहने शेतापर्यंत नेणे कठीण होत आहे. त्यामुळे शेतीसाठी लागणारे साहित्य डोक्यावर किंवा इतर पर्यायाने नेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. याचा थेट परिणाम शेतीच्या कामांच्या नियोजनावर होत आहे.
मनरेगातून रस्त्याचे मजबुतीकरण करण्याची मागणी -
कळमगाव तुकूम येथील पांदन रस्त्याचे तातडीने मजबुतीकरण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) पांदन रस्त्याचे काम हाती घेऊन आवश्यक त्या ठिकाणी मुरूम टाकावा, खड्डे बुजवावेत आणि रस्ता वाहतुकीस योग्य करावा, अशी मागणी होत आहे. रस्त्याचे मजबुतीकरण झाल्यास शेतकऱ्यांना पावसाळ्यातही सहजपणे शेतात जाता येईल. तसेच खते, बियाणे, शेतीची अवजारे आणि शेतमालाची वाहतूक सुलभ होण्यास मदत होईल. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी व रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून, तरीही शेतकऱ्यांच्या वाट्याला हाल -
देशाची ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे. शेतीवर आधारित अनेक उद्योग आणि व्यवसाय चालतात. शेतातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होते. असे असतानाही शेतकऱ्यांना त्यांच्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याची खंत व्यक्त होत आहे. दोन वेळच्या जेवणासाठी रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी साधा, सुरक्षित आणि सुयोग्य रस्ता उपलब्ध नसणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे शासन-प्रशासनाने शेतकऱ्यांच्या या मूलभूत समस्येकडे गांभीर्याने पाहून कळमगाव तुकूम येथील पांदन रस्त्याचे तातडीने मजबुतीकरण करावे, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
.




Petrol Price




