महत्वाच्या बातम्या

 चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार : दुर्गापूरात खळबळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / चंद्रपूर : चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीच्या गळ्यावर भाजी कापण्याच्या चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना दुर्गापूर येथील वैद्यनगर परिसरात २६ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. पत्नीला वाचविण्यासाठी गेलेल्या महिलेच्या हाताच्या बोटालाही चाकू लागल्याने ती जखमी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुकय्या इमरान शेख २६ वर्ष  हिचे इमरान इकबाल शेख  ३० वर्ष रा. दुर्गापूर, वॉर्ड क्रमांक ३ याच्यासोबत २०२० मध्ये विवाह झाला होता. इमरान हा ऑटोचालक आहे. आठ दिवसांपूर्वी दारूच्या नशेत पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने रुकय्या ही आपल्या आईच्या घरी तुकूम तलाव परिसरात राहण्यास गेली होती.

दरम्यान, २६ ऑगस्ट रोजी रुकय्या ही तिची बहीण सुरय्या शेख हिच्या वैयनगर येथील घरी सफेदीच्या कामासाठी मदतीला आली होती. दुपारी साडेचारच्या सुमारास इमरान तेथे आला. त्यावेळी रुकय्या एका मित्रासोबत बोलत असल्याचे पाहून त्याने तिच्यावर संशय घेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर संतापलेल्या इमरानने जवळील भाजी कापण्याच्या चाकूने रुकय्याच्या गळ्यावर वार केला.

हा प्रकार पाहून समरीन जुबेर शेख या भांडण सोडविण्यासाठी पुढे गेल्या असता त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला चाकू लागून त्या जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी रुकय्याला उपचारासाठी चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी रुकय्याची बहीण सुरय्या राजा शेख यांनी दुर्गापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यानुसार इमरान शेख याच्याविरुद्ध कलम १०९(१), ३५२ बी एन एस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास दुर्गापूर पोलिस करीत आहेत.





  Print






Related Photos