लेबर कार्डच्या कामासाठी दोन लाखांची खंडणी : २५० नागरिकांचे आधार व रेशनकार्ड हिसकावले, कर्मचाऱ्याला दिवसभर डांबले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : लेबर कार्ड तयार करण्यासाठी नागरिकांकडून जमा केलेली सुमारे २५० जणांची आधारकार्ड व रेशनकार्डची कागदपत्रे जबरदस्तीने हिसकावून घेत ती परत देण्यासाठी दोन लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत एका कर्मचाऱ्याला तब्बल साडेआठ तास कार्यालयात डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना ब्रम्हपुरी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी २४ नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
या प्रकरणात आरोपी मायासिंग बावरी रा. चोरटी, ता. ब्रम्हपुरी, रमेश सोनटक्के रा. ब्रम्हपुरी आणि कुलदीप कुलसंगे रा. चिमूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्रम्हपुरी येथील शौर्या असंघटित कामगार संघटनेत दिलेश महेंद्र चिमनकर (३२ वर्ष ) हा ऑफिस बॉय म्हणून काम करतो. या संघटनेमार्फत नागरिकांना लेबर कार्ड तयार करून देण्यासह शासनाच्या विविध योजनांचे अर्ज भरून देण्याचे काम केले जाते. संघटनेचे कार्यालय आनंदनगर येथे असून, २९ ऑक्टोबरपासून कार्यालय पुन्हा सुरू करण्यात आले होते. नागरिकांकडून लेबर कार्डसाठी आधारकार्ड व रेशनकार्डच्या प्रती स्वीकारण्याचे काम सुरू होते.
३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास दिलेश कार्यालयात पोहोचला असता तेथे दोघे उपस्थित होते. त्यांनी स्वतःची ओळख मानवी हक्क संघटनेचे कार्यकर्ते म्हणून करून दिली. नागरिकांना कागदपत्रे कार्यालयात देऊ नका, असे सांगत दिलेशकडे काम सुरू करण्याबाबत जाब विचारला. त्यानंतर सुमारे २५० नागरिकांचे आधारकार्ड व रेशनकार्डच्या प्रती जबरदस्तीने ताब्यात घेतल्या.
यानंतर दिलेशला जबरदस्तीने वाहनात बसवून देलनवाडी परिसरातील नागभीड रोडवरील कार्यालयात नेण्यात आले. तेथे त्याला एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. लेबर कार्डचे काम सुरू ठेवायचे असेल तर दोन लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा शैलेश कांबळे यांच्यासह तुलाही संपवून टाकू, अशी धमकी देण्यात आली. दिलेश आणि त्याचा मित्र जगदीश शेवे यांचे मोबाईलही स्वतःजवळ ठेवून घेण्यात आले.
काही वेळाने तिसरा व्यक्ती तेथे आला. त्यानेही दोन लाख रुपये देण्याची मागणी करीत पैसे न दिल्यास कोणालाही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. तसेच दिलेशचा मालक शैलेश कांबळे यांना फोन करून तातडीने पैसे घेऊन येण्यास सांगितले. रात्री १० वाजेपर्यंत दिलेश आणि जगदीश यांना कार्यालयात जबरदस्तीने बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर दोघांना पोलीस ठाण्यासमोरील मंदिराजवळ आणून मोबाईल परत करण्यात आले. दुसऱ्या दिवशी दोन लाख रुपयांची व्यवस्था करून पैसे द्या आणि कागदपत्रे घेऊन जा, असे सांगत त्यांना सोडण्यात आले. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.
२ नोव्हेंबर रोजी मायासिंग बावरी आणि कुलदीप कुलसंगे यांनी पुन्हा दिलेशची भेट घेऊन दोन लाख रुपये देण्याची मागणी केली. मात्र, पैसे नसल्याचे सांगितल्याने कागदपत्रे परत करण्यात आली नाहीत. पैसे न दिल्यास दिलेश, त्याचा मालक शैलेश कांबळे आणि काम करणाऱ्या इतर लोकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे. सुरुवातीला धमक्यांमुळे तक्रार देण्यास धजावले नसलेल्या दिलेश चिमनकर याने अखेर २४ नोव्हेंबर रोजी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तिघांविरुद्ध कलम ३०८(४), ३(५) बीएनएस अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास ठाणेदार कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज खडसे करीत आहेत.




Petrol Price




