लाहेरीतील एकलव्य मॉडेल निवासी विद्यालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : आदिवासी समाजाचे महान जननायक धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त लाहेरी येथे एकलव्य मॉडेल निवासी विद्यालयाचे उद्घाटन १५ नोव्हेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्साहात झाले. या प्रकल्पामुळे या भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, दुर्गम भागातील शिक्षणाला नवी दिशा मिळाली आहे.
एकलव्य मॉडेल स्कूलचे प्राचार्य व्ही. के. यादव, शासकीय आश्रमशाळा लाहेरीचे मुख्याध्यापक एस. के. सयाम, ईपीआयएल मुंबईचे अमर इंजिनिअर, लाहेरीच्या सरपंच राजेश्वरी बोगामी, सचिव जयश्री कुलसंगे, कंत्राटदार भूषण समर्थ, इंजिनिअर केवल गणरपवार, सुमित इंजिनिअर, एम. भारद्वाज उपस्थित होते. सद्यःस्थितीत हे एकलव्य मॉडेल निवासी विद्यालय ताडगाव येथे सुरू असून, येथे एकूण १७१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
लाहेरी येथील विद्यालयाच्या इमारतीचे काही काम अद्याप शिल्लक असल्याने ते पूर्ण झाल्यानंतर जानेवारी महिन्यात हे विद्यालय ताडगाव येथून लाहेरी येथे स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. लाहेरीसारख्या भौगोलिकदृष्ट्या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल भागात अशा प्रकारची निवासी शाळा सुरू होणे, ही केवळ एक शैक्षणिक सुविधा नसून येथील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची मुहूर्तमेढ आहे.
भौगोलिक अडचणी, मर्यादित सुविधा आणि अनेक आव्हानांवर मात करत ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवून देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. आज लाहेरीच्या भूमीत शिक्षणाच्या एका नव्या पर्वाचा शुभारंभ झाला असून, जंगलाच्या कुशीत राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आता आधुनिक शिक्षणाचे बळ मिळणार असल्याची भावना स्थानिकांमधून व्यक्त होत आहे.




Petrol Price




