महत्वाच्या बातम्या

 घराच्या अंगणातच मोहफुल दारूची अवैध भट्टी : पोलिसांच्या छाप्यात २०० लिटर दारू, ३०० लिटर सडवा जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरातील महाकाली कॉलरी परिसरातील आनंदनगर येथे घराच्या अंगणातच मोहफुल दारू तयार करण्याची अवैध भट्टी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहर पोलिसांनी छापा टाकून २०० लिटर तयार मोहफुल दारू आणि ३०० लिटर मोहफुल सडवा असा एकूण ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटे यांच्या नेतृत्वाखालील पथक अवैध दारू व जुगार व्यवसायाविरोधात गस्त घालत होते. यावेळी महाकाली कॉलरी येथील तुलसी दीपक मेश्राम ३५ वर्ष  ही महिला स्वतःच्या घराच्या अंगणात अवैधरित्या मोहफुल दारू तयार करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित महिलेच्या घरावर छापा टाकला. अंगणातील एका कोपऱ्यात विटांचे दोन चुल्हे तयार करून त्यावर टिनाचे डबे ठेवून दारू गाळण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तपासणीदरम्यान तीन प्लास्टिक ड्रममध्ये ३०० लिटर मोहफुल सडवा, ज्याची किंमत १५ हजार रुपये, तर दोन ड्रममध्ये २०० लिटर तयार मोहफुल दारू, ज्याची किंमत १४ हजार रुपये, असा एकूण २९ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. याशिवाय दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे आठ लोखंडी पिपे, जळाऊ लाकूड, स्टीलची भांडी, माठ, प्लास्टिकचे टब आणि बादल्या असा दोन हजार रुपयांचा साहित्यसाठाही पोलिसांनी जप्त केला. दारू व सडव्याचे नमुने तपासणीसाठी सुरक्षित ठेवण्यात आले असून उर्वरित साहित्य पंचांसमक्ष नष्ट करण्यात आले.

या प्रकरणी तुलसी मेश्राम हिच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (क), (ब), (ड) व (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असल्याने संबंधित महिलेला घटनास्थळी नोटीस देऊन सोडण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.





  Print






Related Photos