महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीतील पट्टे नसलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर; जिल्हाधिकाऱ्यांकडून सकारात्मक आश्वासन


- माजी खासदार डॉ. अशोक नेते, आमदार मिलिंद नरोटे व समन्वयक अनिरुद्ध पालकरांच्या पाठपुराव्याला यश

-  १९५८ पासून वहिवाट असलेल्या घोट क्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांना लवकरच ७/१२ उतारे मिळणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील घोट क्षेत्रांतर्गत येणाऱ्या आठ गावांतील शेकडो शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शेतीच्या कायदेशीर पट्ट्यांचा प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आला आहे. माजी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते, आमदार मिलिंद नरोटे आणि मुख्यमंत्री महोदयांचे समन्वयक अनिरुद्ध पालकर यांनी याप्रश्नी घेतलेल्या पुढाकारानंतर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले आहे.

घोट क्षेत्रातील मंजेगाव, किसाननगर, मछली, चक चापलवाडा, हळदवाही, हळदवाही टोला, पेटतळा आणि भाडभीडी या गावांतील शेतकरी सन १९५८ पासून जमिनीवर प्रत्यक्ष शेतीची वहिवाट करत आहेत. त्यांच्याकडे जुन्या अतिक्रमण नोंदणीसह वहिवाटीचे सर्व महत्त्वाचे कायदेशीर पुरावे उपलब्ध आहेत. मात्र, भूमी अभिलेख विभागाकडे या शिवाराची अधिकृत नोंदणी नसल्याने जमिनींचे गट क्रमांक किंवा सर्व्हे क्रमांक निश्चित झालेले नाहीत. परिणामी, कायदेशीर पट्टे आणि ७/१२ उतारे नसल्यामुळे हे शेतकरी केंद्र व राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांच्या लाभापासून वंचित राहत होते. शेतकऱ्यांची ही व्यथा मांडण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी अस्मिता मोरे यांना चर्चेसाठी पाचारण केले आणि उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्याकडील कागदपत्रांची माहिती घेतली. कागदपत्रांची पडताळणी, जमिनीची मोजणी आणि महसूल व भूमी अभिलेख विभागामार्फत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी पंडा यांनी यावेळी दिले. दरम्यान, आमदार मिलिंद नरोटे यांनी याप्रकरणी चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी खलाटे यांना तात्काळ कारवाईचे निर्देश दिले आहेत. तत्पूर्वी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी सविस्तर निवेदन देऊन प्रशासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते.

या शिष्टमंडळात मुख्यमंत्री महोदयांचे ओएसडी अनिरुद्ध पालकर, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, डॉ. प्रणय खुणे, भाजप नेत्या अनिता रॉय, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मनीषा मडावी, स्नेहा मेश्राम, उपाध्यक्ष किशोर कुंडू, पलास घरामी, माजी सरपंच रमेश लेकलवार, आनंदराव तुंकलवार, अंकित मोहुर्ले, रवींद्र गर्तूलवार, देविदास गर्तूलवार, बाबुराव बर्लावार, गिरीधर आलाम, योगेंद्र चौधरी, गजानन गर्तूलवार यांच्यासह शेकडो शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महत्त्वपूर्ण पाठपुराव्यामुळे घोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना लवकरच हक्काचे पट्टे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.





  Print






Related Photos