तिकीट दिले, पैसा खर्च केला, प्रचार केला : आता सत्तेसाठी भूमिका बदलता? डॉ. दिलीप कांबळेंची खंत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी स्वतःची राजकीय प्रतिष्ठा पणाला लावत, आर्थिक खर्च करून आणि जनतेकडे मतदानाचे आवाहन करून पाच उमेदवारांना विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा ‘बहुजन समता पर्व’चे मुख्य संयोजक डॉ. दिलीप कांबळे यांनी केला आहे. मात्र, निवडून आल्यानंतर सत्तास्थापनेच्या राजकारणात काही विजयी उमेदवारांकडून भूमिका बदलल्या जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
डॉ. कांबळे यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेवरील निष्ठा आणि वैयक्तिक प्रामाणिकपणा हीच आपल्या राजकीय जीवनाची आधारभूत भूमिका असल्याचे म्हटले आहे. विविध राजकीय व सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळताना पक्षासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी आपण सातत्याने काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.
महानगरपालिका निवडणुकीत विनोद लाभणे, महानंद वाळके, आकाश मानकर, करिष्मा जंगम आणि हनुमान चौके या पाच उमेदवारांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी पक्षाच्या निवड समितीसमोर आपण ठामपणे भूमिका मांडली. उमेदवारी मिळाल्यानंतर निवडणूक प्रचारासाठी स्वतः खर्च केला, मतदारांमध्ये जाऊन मतदानाचे आवाहन केले आणि संबंधित उमेदवारांना विजयी करण्यासाठी पूर्ण ताकद लावली, असा दावा त्यांनी केला. ज्यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी आपण आपली राजकीय पत पणाला लावली, ज्यांच्यासाठी पैसा खर्च केला आणि जनतेकडे मते मागितली, त्यांनी निवडून आल्यानंतर जनतेच्या विश्वासाचा विचार करणे अपेक्षित आहे, असे डॉ. कांबळे यांनी म्हटले आहे.
सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत एका बाजूकडून प्रस्ताव आल्यानंतर त्या दिशेने आणि दुसऱ्या बाजूकडून प्रस्ताव आल्यानंतर पुन्हा भूमिका बदलण्याची परिस्थिती निर्माण होत असेल, तर अशा राजकारणावर जनतेने प्रश्न उपस्थित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन, मतदारांचा विश्वास आणि निवडून आणण्यासाठी घेतलेले परिश्रम यांचा विसर पडता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. मीच उमेदवारी मिळवून दिली, मीच पैसा खर्च केला, मीच प्रचार केला आणि समाजाकडे मते मागितली. त्यामुळे निवडून आल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधींची भूमिका बदलत असेल, तर त्याचा प्रश्न माझ्या नेतृत्वावरही उपस्थित होतो. ही परिस्थिती निर्माण होणे माझ्यासाठीही आत्मपरीक्षणाचा विषय आहे, अशी स्पष्ट भूमिका डॉ. कांबळे यांनी मांडली.
निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी केवळ स्वतःच्या राजकीय भवितव्याचा विचार न करता सामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य द्यावे. ज्यांनी विश्वास ठेवून मतदान केले, त्या मतदारांना आपल्या भूमिकेचा हिशेब देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. त्यामुळे जनतेनेही निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या सत्तास्थापनेतील भूमिकेचा जाब विचारावा, असे आवाहन डॉ. कांबळे यांनी केले.




Petrol Price




