महत्वाच्या बातम्या

 बल्लारपुरात पहिले जिल्हा आरोग्य साहित्य संमेलन : आशा स्वयंसेविकांचा सन्मान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नये यासाठी समाजाची जीवनपद्धती बदलणे अधिक गरजेचे आहे. व्यसनाधीनतेचा वाढता विळखा, बदलती जीवनशैली आणि पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. त्यामुळे आरोग्य हा केवळ व्यक्तीचा विषय न राहता संपूर्ण समाजाचा विषय बनला पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्रात आरोग्य स्वराज्य ही व्यापक लोकचळवळ उभी करण्याची आवश्यकता आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले. बल्लारपूर येथील गोंडराजे खांडक्या बल्लाळशाह नाट्यगृहात पहिल्या जिल्हा आरोग्य साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. बल्लारपूर पंचायत समिती आणि फिनिक्स साहित्य व सांस्कृतिक प्रतिष्ठान, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. बंग यांनी आरोग्य व्यवस्थेसह सामाजिक आणि पर्यावरणीय प्रश्नांवर भाष्य केले.

मानवी आयुष्यमान वाढविण्यात विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाने मोठी भूमिका बजावली आहे. बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यातही यश मिळाले आहे. मात्र, आयुष्याची वर्षे वाढण्याबरोबरच ती निरोगी राहणे आवश्यक आहे. सध्याच्या जीवनशैलीत बदल न झाल्यास दीर्घायुष्याचा अपेक्षित फायदा मिळणार नाही, असे डॉ. बंग यांनी स्पष्ट केले.

व्यसनाचा प्रसार समाजासाठी गंभीर आव्हान ठरत असून त्याची तुलना त्यांनी प्लेगसारख्या वेगाने पसरणाऱ्या संकटाशी केली. या संकटाचा सामना केवळ शासन किंवा आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून होणार नसून नागरिकांच्या सक्रिय सहभागातूनच त्यावर प्रभावीपणे मात करता येईल, असे त्यांनी सांगितले.

मानवी आरोग्याचा थेट संबंध निसर्गाशी असल्याचे नमूद करताना जल, जंगल आणि जमिनीचे संवर्धन करण्याचे आवाहनही डॉ. बंग यांनी केले. पर्यावरणाचे आरोग्य बिघडले तर त्याचा परिणाम थेट मानवी आरोग्यावर होतो. त्यामुळे आरोग्यविषयक चळवळीला पर्यावरण संवर्धनाची जोड देणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष डॉ. अलका वाढई यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी आशा स्वयंसेविकांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच गोपाल शिरपूरकर लिखित ‘लंकापर्व’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष तथा गटविकास अधिकारी धनंजय साळवे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, तहसीलदार रेणुका कोकाटे, डॉ. प्रशिक वाघमारे, नरेशकुमार बोरीकर, डॉ. संदेश मामीडवार, डॉ. आशा साळवे, डॉ. अश्विनी कांबळे, महिला व बालविकास अधिकारी शुभांगी वहऱ्हाटे आणि गटशिक्षणाधिकारी सचिन माळवी उपस्थित होते. संचालन अविनाश पोईनकर यांनी केले, तर मेघा बलकी यांनी आभार मानले.





  Print






Related Photos