महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूरच्या न्यू कॉलनी-बांबू डेपोतील १९.२३ हेक्टर जमीन शासन जमा: ESIC रुग्णालयासाठी मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर शहरातील न्यू कॉलनी-बांबू डेपो परिसरातील १९.२३ हेक्टर जमीन शासनजमा झाली असून, या जागेवर ESIC रुग्णालय उभारण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही जमीन शासनाच्या ताब्यात आली असून, आता शहरातील कामगार व सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी या जागेचा उपयोग करण्याची मागणी जोर धरत आहे.

मौजा बल्लारपूर येथील बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेड (BGPPL) यांना निवासी प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आलेल्या शासकीय जमिनीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मंजूर उद्देशाव्यतिरिक्त जमिनीचा वापर झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील तरतुदींनुसार कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर १९.२३ हेक्टर जमीन शासनजमा करण्यात आली आहे.

या जमिनीबाबत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तसेच शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. शासनाच्या अटी-शर्तींचे पालन झाले आहे का, याची तपासणी करून अटीभंग झाल्यास जमीन शासनजमा करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळून जमीन आता शासनाच्या ताब्यात आली आहे.

बल्लारपूर हे औद्योगिक शहर असून येथे मोठ्या संख्येने कामगार वर्ग वास्तव्यास आहे. शहरातील कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनजमा झालेल्या न्यू कॉलनी-बांबू डेपो परिसरातील १९.२३ हेक्टर जागेवर ESIC रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून करण्यात आली आहे.

ESIC रुग्णालय उभारल्यास बल्लारपूरसह परिसरातील औद्योगिक कामगार, त्यांचे कुटुंबीय तसेच संबंधित लाभार्थींना मोठा फायदा होणार आहे. सध्या उपचारासाठी चंद्रपूर किंवा इतर शहरांकडे जावे लागणाऱ्या नागरिकांना स्थानिक पातळीवरच अधिक सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.शासनजमा झालेली ही मोठी जमीन बल्लारपूरच्या भविष्यातील विकासासाठी महत्त्वाची ठरणार आहे. या जागेचा वापर सार्वजनिक सुविधा आणि लोकहिताच्या प्रकल्पांसाठी नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ESIC रुग्णालयासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून या जागेचा आरोग्य सुविधेसाठी उपयोग करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शासनजमा झालेल्या १९.२३ हेक्टर जमिनीमुळे बल्लारपूरच्या आरोग्य सुविधांच्या विस्ताराला नवी संधी निर्माण झाली आहे.





  Print






Related Photos