महत्वाच्या बातम्या

 इंद्रावतीचा दाब वाढला, पर्लकोटा फुगली : भामरागड पुन्हा पाण्याखाली; १०० हून अधिक घरे-दुकाने जलमय


- नवीन पुलाचा जोडरस्ताच पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प

- पूल झाला, पण पूर कधी थांबणार?; नागरिकांचा प्रशासनाला सवाल

- मुसळधार पावसात पोलिसांची माणुसकी: चिमुकलीसह गंभीर रुग्णांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित हलवले
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : छत्तीसगड परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीवरील पाण्याचा दाब प्रचंड वाढला असून, पर्लकोटा नदीनेही रौद्ररूप धारण केले आहे. यामुळे भामरागड शहराला पुन्हा एकदा पुराचा मोठा फटका बसला असून मुख्य व्यापारीपेठेसह १०० हून अधिक घरे व दुकाने पाण्याखाली गेली आहेत. भामरागडवासीयांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य आणि पूरग्रस्तांना मदत वितरणाचे काम वेगाने सुरू आहे.

पावसाळा आला की भामरागडवासीयांच्या उराशी पुराची भीती आणि नुकसानाचा यक्षप्रश्न उभा ठाकतो. वर्षानुवर्षे नागरिक या संकटाचा सामना करत आहेत. वाहतुकीची कोंडी सुटावी यासाठी पर्लकोटा नदीवर नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले खरं, पण पूरस्थिती निर्माण होताच पुलाकडे जाणारा भामरागड हेमलकसा मार्गावरील कोठी टी-पॉईंट परिसरच पाण्याखाली गेला आहे. पूल बांधला, पण पुराच्या वेळी जोडरस्ताच पाण्याखाली जात असेल, तर या पुलाचा उपयोग काय? असा संतप्त सवाल आता भामरागडचे नागरिक विचारत आहेत.

सध्या पुराचे पाणी अतिशय संथ गतीने ओसरत असले, तरी शहराभोवतीचा पुराचा वेढा कायम आहे. केवळ पूल बांधून पुराची समस्या सुटणार नसून नदीपात्रातील गाळ काढणे, पाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था आणि जोडरस्त्यांची उंची वाढवणे यांसारख्या कायमस्वरूपी दीर्घकालीन उपाययोजना आखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

माणुसकीचे दर्शन: पुराच्या पाण्यातून चिमुकलीसह रुग्णांना वाचवले -
नैसर्गिक आपत्तीच्या या कठीण काळात प्रशासकीय यंत्रणा आणि पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठे अनर्थ टळले आहेत ट्रॅक्टर अन् दुचाकीवरून वैद्यकीय मदत बिनागुंडा येथील विनोबा भावे आश्रमशाळेतील दुसरीतील विद्यार्थिनी संगीता चुक्कू उसेंडी हिला तीव्र मलेरियाची लागण झाली होती. मार्ग पाण्याखाली गेलेले असतानाही पोलीस जवान, शिक्षक, ग्रामस्थ आणि ट्रॅक्टर चालकांनी जिवाची पर्वा न करता, आधी दुचाकी अन् नंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने भरलेले नदी-नाले पार करत संगीताला लाहेरी आरोग्य केंद्रात पोहोचवले. तिची प्रकृती आता स्थिर आहे.

एसडीआरएफच्या बोटीने रुग्णांना अहेरीला हलवले भामरागड ग्रामीण रुग्णालयातील दोन गंभीर रुग्णांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने हलवणे गरजेचे होते. तहसीलदार किशोर बागडे यांच्यमार्गदर्शनाखालीएसडीआरएफच्या (SDRF) पथकाने बोटीच्या साहाय्याने फुगलेली पर्लकोटा नदी ओलांडून रुग्णांना पलीकडच्या रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवले. तेथून त्यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.





  Print






Related Photos