कर्तव्यदक्षांना भगिनींची मायेची ओवाळणी : फुले आंबेडकर सोशल वर्क कॉलेजतर्फे सी-६० मुख्यालयात ७५ जवानांसोबत रक्षाबंधन साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यात अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत नक्षलवादाशी लढा देत नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र तैनात असणाऱ्या सी-६० (C-60) दलाच्या ७५ जवानांसोबत यंदाचा रक्षाबंधन सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारे संचालित फुले- आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली येथील महिला कक्ष विभागाच्या वतीने सी-६० च्या मुख्यालयात या अनोख्या आणि कौटुंबिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या कुटुंबापासून दूर राहून, सण-उत्सवांची पर्वा न करता गडचिरोलीच्या जंगलात कर्तव्य बजावणाऱ्या या वीर जवानांना घराची उणीव भासू नये, या उद्देशाने महाविद्यालयाच्या महिला कक्षाने थेट सी-६० मुख्यालयात जाऊन जवानांना राख्या बांधल्या.
धोटे सर आणि प्राध्यापिकांची प्रमुख उपस्थिती -
या सोहळ्याला सी-६० कार्यालयाचे समन्वयक धोटे सर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाच्या महिला कक्ष प्रमुख प्रा. डॉ. कविता उईके, प्रा. प्रज्ञा वनमाळी यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
राखी बांधून दिल्या सुरक्षिततेच्या शुभेच्छा कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयाच्या प्राध्यापिका आणि विद्यार्थिनींनी सी-६० च्या ६० जवानांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण केले. त्यांना कुंकवाचा टिळा लावून आणि मनगटावर प्रेमाची राखी बांधून जवानांच्या दीर्घायुष्यासाठी व सुरक्षेसाठी प्रार्थना केली. या पवित्र सणाच्या निमित्ताने जवानांचे तोंड गोड करण्यात आले. भगिनींच्या या मायेच्या स्पर्शामुळे उपस्थित जवान अत्यंत भावूक झाले होते.
सी-६० दलाचे जवान आपल्या प्राणाची बाजी लावून गडचिरोली जिल्ह्याला सुरक्षित ठेवतात. या देशाच्या खऱ्या रक्षकांसोबत रक्षाबंधन साजरा करणे आणि त्यांच्या पाठीशी बहिणी म्हणून उभे राहणे, हे आमचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन महिला कक्ष प्रतिनिधीनि केले. या हृदयस्पर्शी सोहळ्यामुळे जवानांचे मनोधैर्य कमालीचे वाढले असून, महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकी जपत राबवलेल्या या उपक्रमाचे सी-६० कार्यालय आणि संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कौतुक होत आहे.




Petrol Price




