शिवाजी महाराजांचे दुर्मीळ सोन्याचे नाणे आणि कवड्यांची माळ मुंबईत
- शिवराज्याभिषेक दिनोत्सव निमित्याने मुंबईकरांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : दिल्लीचा पातशहा हा एकच राजा, अशी त्यावेळी उभ्या हिंदुस्थानची समजूत होती. पण दिल्लीच्या तख्ताला हादरे देत, रयतेचे सार्वभौम सुवर्णसिंहासन श्रीमद रायगडावर स्थापन करून, शिवाजी महाराजांच्या रूपाने मराठा राजा छत्रपती झाला ही त्याकाळची असामान्य अशी घटना होती. अशा वेळी आजूबाजूला वापरात असलेल्या उर्दू-फारसी नाण्यांचे अनुकरण न करता, महाराजांनी आपला स्वभाषेविषयीचा अभिमान दाखवत राज्याभिषेकाच्यावेळी देवनागरी लिपीत पाडलेली स्वराज्याची नाणी ही इतिहासातील त्याहून अधिक क्रांतिकारी घटना आहे.
भारताच्या इतिहासात अभिमानास्पद असणाऱ्या शिवराज्याभिषेकाच्या क्रांतिकारी घटनेची साक्षीदार असलेली छत्रपतींची सुवर्ण होन नाणी आजमितीस अत्यंत दुर्मीळ आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवलच्या निमित्ताने शिवाजी महाराजांचे हे दुर्मीळ सोन्याचे नाणे शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड आणि ज्येष्ठ नाणीसंग्राहक अशोक सिंह ठाकूर यांच्या विशेष सहकार्याने प्रत्यक्ष पाहण्याचा सुवर्णक्षण मुंबईकरांना प्राप्त होत आहे.
तसेच याच आर्ट फेस्टिवलमध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांच्या घराण्याकडे असणारी शिवाजी महाराजांची दुर्मीळ कवड्यांची माळ पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
News - Rajy