वर्धा नदीत पाच युवकांवर काळाचा घाला : तिघांचे मृतदेह सापडले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : घुग्घुस येथील वर्धा नदी घाट परिसरात घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. सोमवारी दुपारी घरातून बाहेर पडलेले पाच युवक वर्धा नदीच्या पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आली असून मंगळवारी सायंकाळपर्यंत तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत. उर्वरित दोघांचा शोध युद्धपातळीवर सुरू असून या घटनेमुळे घुग्घुस शहरासह परिसरात शोककळा पसरली आहे.
माहितीनुसार, इंदिरा नगर येथील तन्मय नवनाथ पथाडे (१८), रोहित बाबाराव बोबडे (१७), सनी आसमपेल्लीवार (१७), नकुल भास्कर केळझरकर (२०) आणि सम्यक देवराव सोनटक्के (१९) हे सोमवारी दुपारी वर्धा नदी घाट परिसरात गेले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. नातेवाईक व मित्रांनी परिसरात शोधाशोध सुरू केली असता नदीकाठी पाचही युवकांचे कपडे, चप्पल आणि मोबाईल फोन आढळून आले. त्यामुळे मोठ्या अनर्थाची भीती व्यक्त करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच घुग्घुस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर चंद्रपूर येथून विशेष बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. मंगळवारी पहाटेपासून नदीत व्यापक शोधमोहीम राबविण्यात आली.
शोध मोहीमेदरम्यान सकाळी साडेसातच्या सुमारास तन्मय नवनाथ पथाडे याचा मृतदेह डब्ल्यूसीएल पाणी टाकी परिसरालगत नदीत आढळून आला. त्यानंतर दुपारी रोहित बाबाराव बोबडे आणि सनी आसमपेल्लीवार यांचेही मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले. एकामागोमाग तीन युवकांचे मृतदेह सापडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अनेकांनी अश्रू अनावर होत मृत युवकांना श्रद्धांजली अर्पण केली. या दुर्घटनेमुळे घुग्घुस शहरात शोकमय वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, नकुल भास्कर केळझरकर आणि सम्यक देवराव सोनटक्के यांचा शोध अद्याप सुरू आहे. बचाव पथक, पोलीस व प्रशासनाकडून नदीच्या विविध भागात कसून शोधमोहीम राबविण्यात येत असून दोघांचा शोध लागण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला असून पाच युवकांच्या भवितव्यावर काळाने घाला घातल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
News - Chandrapur




Petrol Price




