महत्वाच्या बातम्या

 बोगस सोयाबीन बियाण्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान : बुस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनीविरुद्ध गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर व भद्रावती तालुक्यांतील शेतकऱ्यांची कथित फसवणूक केल्याप्रकरणी बुस्टर प्लांट जेनेटिक्स प्रा. लि. या बियाणे उत्पादक कंपनीविरुद्ध कृषी विभागाने मोठी कारवाई सुरू केली आहे. सदोष सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा ठपका ठेवत कृषी विभागाच्या गुण नियंत्रण अधिकाऱ्यांनी चिमूर आणि भद्रावती पोलीस ठाण्यात स्वतंत्र फिर्यादी दाखल केल्या आहेत. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील बियाणे विक्री व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चिमूर तालुक्यातील कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) विलास कवडू शेंडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, बुस्टर प्लांट जेनेटिक्स प्रा. लि. कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांबाबत तालुक्यातील १७ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची तालुका तक्रार निवारण समितीमार्फत प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करण्यात आली. समितीच्या अहवालात संबंधित शेतकऱ्यांच्या पिकांचे ८० ते ८५ टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे निष्पन्न झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

तपासादरम्यान संबंधित बियाण्यांच्या पिशवीवर सर्वोत्तम दर्जाची हमी – शंभर टक्के समाधान असा दावा करण्यात आल्याचे आढळले. कृषी विभागाच्या मते, असा दावा बियाणे नियम, १९६८ मधील नियम १० चे उल्लंघन असून तो शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा आहे. तसेच संबंधित बियाणे हे सत्यता दर्शक बियाण्यांच्या प्रकारात मोडत असल्याने त्याच्या उत्पादन, पॅकिंग व सीलबंद प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी उत्पादक कंपनीवरच असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दुसरीकडे, भद्रावती तालुक्यातील कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) प्रफुल घेशराव अडकिने यांनीही भद्रावती पोलीस ठाण्यात स्वतंत्र फिर्याद दाखल केली आहे. कान्सा शिरपूर, मासळ व रत्नापूर येथील १७ शेतकऱ्यांनी बुस्टर कंपनीच्या हुतुतु या सोयाबीन वाणाची पेरणी करूनही अपेक्षित उगवण झाली नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर तालुका तक्रार निवारण समितीने प्रत्यक्ष शेतपाहणी करून पंचनामे तयार केले.

खरीप हंगाम २०२६-२७ अंतर्गत संबंधित बियाण्यांचे नमुने विक्री केंद्रातून घेऊन नागपूर येथील शासकीय बीज परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेच्या अहवालात संबंधित बियाणे अप्रमाणित व सदोष असल्याचे स्पष्ट झाल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे.फिर्यादीनुसार, कंपनीने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी बियाण्यांच्या पिशव्यांवर दिशाभूल करणारे दावे छापले आणि सदोष बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणात कंपनीशी संबंधित राहुल रामभाऊ पुरमे यांच्यासह कंपनीविरुद्धही गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणात संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५, बियाणे कायदा, १९६६, बियाणे नियम, १९६८ तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८(४) आणि ३(५) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी कृषी विभागाने केली आहे.

एकाच कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांबाबत जिल्ह्यातील दोन तालुक्यांत समान स्वरूपाच्या तक्रारी समोर आल्याने खरीप हंगामातील बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणातील पोलीस तपास, दोषींवर होणारी कारवाई आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई याकडे संपूर्ण कृषी क्षेत्राचे लक्ष लागले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos