महत्वाच्या बातम्या

 नक्षलवाद्यांनी रोखलेल्या सर्व शासकीय योजना आता प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे हेच उद्दिष्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


- गडचिरोलीतील २२ मिनी सेतू केंद्रांचे लोकार्पण; दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी झाल्यानंतर आता शासनाची प्राथमिकता दुर्गम भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय योजना आणि सेवा प्रभावीपणे पोहोचविण्याची आहे. अनेक वर्षे नक्षलवाद्यांमुळे रोखल्या गेलेल्या शासनाच्या सर्व योजना आता प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे हेच राज्य शासनाचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व संवेदनशील भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या २२ मिनी सेतू केंद्रांचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. या कार्यक्रमाला मुंबई येथून राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर गडचिरोली येथून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश उपस्थित होते. भामरागड व एटापल्ली तालुक्यातील मिनी सेतू केंद्रांचे चालक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारीही दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, प्रशासनाची उपस्थिती केवळ कार्यालयापुरती मर्यादित न राहता त्याचा लोकाभिमुख चेहरा नागरिकांना प्रत्यक्ष अनुभवता आला पाहिजे. शासनाच्या सेवा वेळेवर, पारदर्शक आणि सहज उपलब्ध झाल्यास लोकशाही व्यवस्था नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते. मिनी सेतू केंद्रांमुळे आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांना याची प्रचिती येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी भामरागड येथील मिनी सेतू केंद्राशी संवाद साधून इंटरनेट सुविधा आणि सेवा वितरणाची माहिती जाणून घेतली. केंद्रावर इंटरनेट सुविधा सुरळीत सुरू असून रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार सेवा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ नियमितपणे नागरिकांना दिला जात असल्याची माहिती केंद्र चालकांनी दिली.

आरेवाडा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचांनीही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना मिनी सेतू केंद्र सुरू झाल्यानंतर गावातील नागरिकांना जन्म, रहिवासी, उत्पन्न यांसह विविध दाखले गावातच सहज उपलब्ध होत असल्याचे सांगितले. त्यामुळे तालुका मुख्यालयापर्यंत वारंवार जावे लागत नसून नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम मोठ्या प्रमाणात वाचत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्या गडचिरोली दौऱ्यादरम्यान या अभिनव उपक्रमाची संकल्पना मांडण्यात आली होती. पूर्वी नक्षलप्रभावित भागात महसूल व इतर शासकीय यंत्रणांना पोहोचणे अत्यंत कठीण होते. अशा परिस्थितीत पोलीस विभागाने पोलीस दादालोरा खिडकी या उपक्रमाच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या सेवा पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्याच संकल्पनेचा विस्तार म्हणून आता मिनी सेतू केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे.

मिनी सेतू केंद्रांची वैशिष्ट्ये -
गडचिरोली जिल्ह्यातील भौगोलिक दुर्गमता आणि डिजिटल दरी लक्षात घेऊन भामरागड व एटापल्ली तालुक्यात एकूण २२ मिनी सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये ९ आदी सेवा केंद्रे आणि १३ पोलीस दादालोरा खिडकी केंद्रांचे मिनी सेतू केंद्रांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.

या केंद्रांमधून रहिवासी, जात, उत्पन्न, जन्म आदी दाखले, महाआयडी नोंदणी, आधार सेवा, बँकिंग सुविधा, विविध शासकीय योजनांचे अर्ज, पेन्शन सेवा आदी सुविधा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. राज्य सेतू सोसायटीमार्फत प्रत्येक केंद्राला संगणक, प्रिंटर, स्कॅनर, फर्निचर तसेच इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक केंद्र चालकाला एक वर्षासाठी दरमहा ८ हजार रुपयांचे ऑपरेशनल सहाय्य दिले जाणार आहे.

आरेवाडा, हेडरी, लाहेरी, टेकला, मल्लमपोडूर ग्रामपंचायत क्षेत्रांतील आदी सेवा केंद्रांसह धोडराज, वांगेतुरी, गर्देवाडा, कोठी आणि मन्नेराजाराम पोलीस ठाण्यांतील पोलीस दादालोरा खिडकी केंद्रांचे मिनी सेतू केंद्रांमध्ये रूपांतर करण्यात आले असून, उर्वरित आदी सेवा केंद्रे आणि पोलीस दादालोरा खिडकी केंद्रांद्वारेही दुर्गम भागातील नागरिकांना अधिक प्रभावीपणे शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या उपक्रमामुळे गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागातील नागरिकांना शासनाच्या सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध होणार असून, डिजिटल प्रशासनाच्या माध्यमातून विकासाची नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.





  Print






News - Rajy




Related Photos