पोकरा योजनेतून महिलांनी उभारला तेल प्रक्रिया व मसाला उद्योग
- हमदापुर येथील महिलांनी केली किमया, तेल, पापड, हळद, तिखटाचे उत्पादन
- हमदापुर ठरले पोकराचे सर्वात मोठे गाव
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा ही योजना जिल्ह्यात महिलांसाठी वरदान ठरत आहे. सेलू तालुक्यातील हमदापुर हे गाव पोकरा योजनेचे सर्वात मोठे गाव ठरले आहे. या गावात सिध्दार्थ ग्रामसेवा संघ यागटाच्या महिलांनी योजनेच्या सहकार्याने शेंगदाना तेलासह विविध मसाल्यांचा उद्योग यशस्वीपणे सुरु केला आहे.
हमदापूर या गावात योजनेच्या सहकार्याने उमेदचे तब्बल 65 महिला बचतगट कार्यरत आहे. या गावातील महिला परंपरेने शेतमजुरी व आपल्या शेतात राबून उदरर्निवाह भागवित होत्या. पोकरा या योजनेत वैयक्तिक लाभासह सामुहिक लाभाच्या योजना असल्याने या योजनांबाबत महिलांना माहिती देण्यात आली. गृह उद्योगाबाबत महिलांना अवगत करण्यात आले. प्रक्रिया उद्योग कसे सुरु करावे, त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आदींची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी अजय राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.
त्यानंतर काही महिलांनी प्रभावित होऊन गृह उद्योग सुरु करण्याचा ध्यास घेतला.गृह उद्योगासाठी महिलांना प्रकल्प अहवाल कसा तयार करावा याचे मार्गदर्शन करण्यात आले आणि 7 लक्ष 10 हजार रुपये मुल्याचा प्रकल्प तयार करण्यात आला. सुरुवातीस महिलांनी पापड मशीन, कांडप मशीन, चक्की, हळद मशीन, ओला मसाला व ओली दाळ दळण मशीन घेऊन उद्योग सुरु करण्याचे ठरविले. यासाठी महिलांनी गटाची बैठक घेतली व उद्योगासाठी जागेचा प्रश्न सोडविला. कृषी विभागाच्या वतीने प्रकल्पाला मान्यता मिळाल्यानंतर महिलांनी स्वत: तत्कालीन औरंगाबाद आणि आताचे छत्रपती संभाजीनगर येथे जावून आवश्यक यंत्र व साहित्याची खरेदी केली.
यंत्र व साहित्याची शेड मध्ये उत्तम मांडणी करून उत्पादनास सुरुवात केली आहे. कागदपत्रांची पाहणी व पुर्व मोका तपासणी केल्यानंतर महिला गटाला या उद्योगासाठी 4 लक्ष रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले. सद्या या गटाच्यावतीने पापड, विविध मसाल्यांचे कांडप, हळद, तिखट आदींचा प्रक्रिया उद्योग यशस्वीपणे चालविला जात आहे. नुकतेच शेंगदाना तेलाचा प्रक्रिया उद्योग देखील महिलांच्यावतीने यशस्वीपणे सुरु करण्यात आला आहे. या सर्व उत्पादनांचा चांगली मागणी असल्याने गटाला चांगले उत्पन्न मिळत आहे.
प्रकल्पाला थ्री-फेज वीज कनेक्शन : महिलांनी सुरु केलेल्या या उद्योगाला तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट दिली होती. त्यावेळी महिलांनी उद्योग नियमितपणे सुरु राहण्यासाठी वीज पुरवठ्याची अडचण असल्याचे सांगितले होते तसेच थ्री-फेज वीज कनेक्शन मिळावे, अशी विनंती केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची विनंती मान्य करत या प्रकल्पास थ्री-फेज वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
News - Wardha