प्रस्तावित जमीन अधिग्रहणाबाबत शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार : आ. डॉ. मिलिंद नरोटे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली येथील कर्तव्य कक्ष कार्यालयात आज जयरामपूर परिसरातील विविध गावांतील शेतकरी बांधवांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची भेट घेऊन प्रस्तावित जमीन अधिग्रहणाबाबत आपल्या समस्या व भावना मांडल्या. शेतकऱ्यांनी आपल्या उपजीविकेचा मुख्य आधार असलेली सुपीक व शेतीयोग्य जमीन अधिग्रहित करण्यात येऊ नये, अशी ठाम भूमिका यावेळी मांडली.
यावेळी जयरामपूर, पारडीदेव, यादवपल्ली, बामणीदेव, चित्तरंजनपूर, किष्टापूर, येणापूर, दुर्गापूर, सेल्लूर, लक्ष्मणपूर, गणपूर (रै), विठ्ठलपूर, मुधोली तुकूम, मुधोली चक-१, मुधोली चक-२ आणि वायगाव येथील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी जमीन अधिग्रहणामुळे उद्भवणाऱ्या अडचणी, शेतीवरील अवलंबित्व आणि भविष्यातील उपजीविकेबाबतच्या चिंता आमदार डॉ. नरोटे यांच्यासमोर मांडल्या.
यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी शेतकरी बांधवांच्या भावना समजून घेत त्यांच्या मागण्यांचा सविस्तर पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. विकासकामे महत्त्वाची असली तरी शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचणार नाही, यासाठी शासन स्तरावरील संबंधित विभागांशी चर्चा करून शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी हिताला प्राधान्य देत त्यांच्या समस्या शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची भूमिका कायम राहील, असेही आ. डॉ. मिलिंद नरोटे यांनी सांगितले.
News - Gadchiroli




Petrol Price




