महत्वाच्या बातम्या

 वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू : शेळीच्या शोधात गेलेल्या व्यक्तीवर जंगलात हल्ला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) परिसरातील गिरगाव जंगल परिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका गुराख्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी १८ जून रोजी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत व्यक्तीचे नाव आत्माराम दसरू बोरकर (वय ५२), रा. गिरगाव, ता. नागभीड असे आहे. ते गुराखी असून नेहमीप्रमाणे शेळ्यांना चराईसाठी गिरगाव जंगल परिसरात घेऊन गेले होते. सायंकाळी शेळ्यांचा कळप घरी परतल्यानंतर एक शेळी कमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे हरविलेल्या शेळीचा शोध घेण्यासाठी आत्माराम बोरकर पुन्हा जंगलात गेले.

मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांना चिंता वाटू लागली. त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने रात्रीभर जंगल परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. तरीही त्यांचा कोणताही मागमूस लागला नाही. याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आली.

शुक्रवारी सकाळी वन विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने पुन्हा शोधमोहीम सुरू केली. यावेळी गिरगाव बिटमधील गोविंदपूर राऊंड अंतर्गत कक्ष क्रमांक ५३५ मध्ये आत्माराम बोरकर यांचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक पाहणीत वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास व कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी ए. आर. कन्नमवार, सहाय्यक वनरक्षक महेश गायकवाड तसेच तळोधी पोलीस ठाण्याचे ठाणेदार राहुल गुहे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या घटनेनंतर गिरगाव व परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने नागरिकांना जंगल परिसरात एकटे न जाण्याचे आवाहन केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos