लॉयड्स मेटल्सच्या स्टोअरवर मध्यरात्री हात साफ : ३.४५ लाखांचा औद्योगिक साहित्यसाठा चोरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील नवीन दहेली (लावारी) येथे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या बांधकामाधीन स्टोअरवर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाड टाकत तब्बल ३ लाख ४५ हजार ५०० रुपयांचे औद्योगिक साहित्य लंपास केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याप्रकरणी कंपनीचे एचआर मॅनेजर अंजनकुमार शंभुनाथ सिन्हा ६० वर्ष यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, कंपनीने नवीन दहेली (लावारी) येथे भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेवर स्टोअर रूम व कार्यालयाचे बांधकाम सुरू असून टिनशेडच्या वरांड्यात वेल्डिंग साहित्य, गॅस सिलिंडर व इतर यंत्रसामग्री ठेवण्यात आली होती.
परिसराच्या सुरक्षेसाठी दोन सुरक्षा रक्षकही नियुक्त करण्यात आले होते. १२ जुलै रोजी सायंकाळी कामकाज संपल्यानंतर साहित्य नेहमीप्रमाणे सुरक्षित ठेवण्यात आले होते. मात्र १३ जुलै रोजी सकाळी सुमारे ८ वाजता स्टोअर इंचार्ज सोमेन कर्मकार यांनी पाहणी केली असता साहित्य गायब असल्याचे निदर्शनास आले. याबाबत सुरक्षा रक्षकांना विचारणा केली असता त्यांनी रात्री १ वाजल्यानंतर झोप लागल्याचे सांगितल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.
चोरीस गेलेल्या साहित्यामध्ये ३ एचपी कंपनीचे गॅस सिलिंडर, ९५ एमएमचे ११ बंडल कॉपर वेल्डिंग केबल, ५० एमएमचे ४ बंडल वेल्डिंग केबल तसेच १५ वेल्डिंग होल्डर यांचा समावेश असून त्याची एकूण किंमत ३,४५,५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केले असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत करीत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




