महत्वाच्या बातम्या

  अंगणवाड्यांत चिमुकल्यांसाठी २१ दिवस, २१ गोष्टींचा उपक्रम


- महिला व बालविकास विभागाचे सेवा संकल्प अभियान; माता गट, आजी-आजोबांसोबत गप्पा आणि झिरो कॉस्ट नवोपक्रमातून बालविकासाला चालना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : बालकांचे आरोग्य, पोषण, शिक्षण आणि सर्वांगीण विकास साधण्यासोबतच गरोदर व स्तनदा मातांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि कुटुंबाचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाच्या वतीने सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असून, माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी, चिमुकल्यांसाठी २१ दिवस २१ गोष्टी आणि आजी-आजोबांसोबत गप्पा या उपक्रमांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. बालकांना पोषण आणि आरोग्य सेवा देण्यासोबतच त्यांच्या बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासाला चालना देणे, तसेच अंगणवाडी केंद्रांमध्ये आनंददायी वातावरण निर्माण करणे हा या उपक्रमांचा उद्देश आहे. यासाठी स्थानिक समुदाय, पालक आणि कुटुंबांचा सहभाग वाढविण्यावरही भर देण्यात येणार आहे.

गरोदर व स्तनदा मातांसाठी माता गट -
गरोदर माता व स्तनदा मातांना आरोग्य, पोषण आणि माता-बाल संगोपनाबाबत आवश्यक मार्गदर्शन सातत्याने मिळावे, यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांच्या कार्यक्षेत्रात माता गट स्थापन करण्यात येत आहेत. या गटांमध्ये गरोदर तसेच स्तनदा मातांचा समावेश केला जाणार आहे. माता गटाच्या माध्यमातून मातांना संतुलित आहार, गरोदरपणातील काळजी, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची काळजी, स्तनपान, बालकांचा पूरक आहार, स्वच्छता, बालकांची वाढ व विकास तसेच उपलब्ध आरोग्य व पोषण सेवांबाबत नियमित मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

माता गटाच्या बैठकींमध्ये अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य विभागातील संबंधित कर्मचारी आणि आवश्यकतेनुसार तज्ज्ञ व्यक्ती सहभागी होऊन मातांना मार्गदर्शन करतील. मातांच्या समस्या, अनुभव आणि अडचणी समजून घेऊन त्यावर योग्य मार्गदर्शन करण्याबरोबरच आवश्यक सेवांशी समन्वय साधण्यात येणार आहे.

माझी अंगणवाडी, माझी जबाबदारीचा सामुदायिक संकल्प -
अंगणवाडी केंद्र स्वच्छ, सुरक्षित, सुंदर आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी तसेच बालकांच्या पोषण, शिक्षण व आरोग्यासाठी समुदायाचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत सामुदायिक प्रतिज्ञा घेण्यात येणार असून, अंगणवाडी केंद्राच्या विकासात पालक, स्थानिक नागरिक आणि समुदायाचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येईल. बालकांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि पोषक वातावरण निर्माण करण्याची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली जाणार आहे.

२१ दिवस, २१ गोष्टींतून संस्कार आणि शिक्षण -
अंगणवाडी केंद्रातील बालकांसाठी २१ दिवस २१ गोष्टी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. गोष्टींच्या माध्यमातून बालकांच्या कल्पनाशक्तीला चालना देतानाच त्यांना संस्कार, जीवनमूल्ये आणि विविध अनुभवांची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच आजी-आजोबांसोबत गप्पा या उपक्रमातून बालकांना ज्येष्ठांच्या अनुभवविश्वाशी जोडले जाणार आहे. आजी-आजोबांच्या अनुभवातून बालकांना गोष्टी, संस्कार, पारंपरिक ज्ञान आणि जीवनमूल्यांची ओळख करून देण्यात येणार आहे. यामुळे बालकांना अनुभवातून शिकण्याची संधी मिळण्याबरोबरच पिढ्यांमधील संवादही वाढण्यास मदत होणार आहे.

Zero Cost नवोपक्रमातून साकार होणार शैक्षणिक साधने -
अंगणवाडी केंद्रांमध्ये उपलब्ध स्थानिक व टाकाऊ साहित्याचा पुनर्वापर करून शून्य किंवा अत्यल्प खर्चात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी Zero Cost Anganwadi Innovations Challenge हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत अंगणवाडी सेविका आपल्या कल्पकतेचा वापर करून उपलब्ध साहित्यापासून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्य, खेळणी, अध्ययन कोपरे, पोषण व स्वच्छता विषयक उपक्रम तसेच कृती आधारित शिक्षण साधने तयार करणार आहेत. यामुळे उपलब्ध स्थानिक साधनसामग्रीचा पुनर्वापर होण्यासोबतच बालकांना खेळातून, कृतीतून आणि अनुभवातून शिकण्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

पोषण बाग, अध्ययन कोपऱ्यांसह बालस्नेही वातावरण -
अंगणवाडी परिसरात पोषण बाग, अध्ययन कोपरा, खेळातून शिक्षण, स्वच्छता व आरोग्य जनजागृती कोपरा यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या माध्यमातून बालकांना आनंददायी, सुरक्षित आणि बालस्नेही वातावरण उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. पोषण, आरोग्य, शिक्षण, संस्कार आणि खेळ यांची सांगड घालत अंगणवाडी केंद्रांचा सर्वांगीण विकास करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बालकांसोबतच माता, पालक आणि स्थानिक समुदायाचा सहभाग वाढवून अंगणवाडी केंद्रांना अधिक सक्षम बनविण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाणार आहे.

बालक, माता आणि कुटुंबाच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार असून, बालकांना आनंददायी व बालस्नेही वातावरण उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात येत असल्याचे जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांनी कळविले आहे.





  Print






Related Photos