महत्वाच्या बातम्या

 कमल गरबा महोत्सवात स्नॅप डान्स ग्रुप पुन्हा चॅम्पियन : ५१ हजारांचे प्रथम पारितोषिक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : नवरात्रोत्सवाच्या उत्साहात रंगलेल्या कमल गरबा महोत्सवाची रविवार, १८ ऑक्टोबर रोजी भव्य पारितोषिक वितरण समारंभाने सांगता झाली. बल्लारपूर येथील शगुन लॉनसमोरील मैदानावर भाजप महिला मोर्चा, बल्लारपूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय महोत्सवात स्पर्धकांनी आपल्या नृत्यकौशल्याने उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेत स्नॅप डान्स ग्रुपने पुन्हा एकदा प्रथम क्रमांक पटकावत ५१ हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले. विशेष म्हणजे, काँग्रेसच्या वतीने आयोजित रंगताली गरबा महोत्सवातही स्नॅप डान्स ग्रुपने प्रथम पारितोषिक पटकावले होते. त्यामुळे सलग दोन गरबा महोत्सवांमध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याची कामगिरी या ग्रुपने केली.

कमल गरबा महोत्सवातील कपल डान्स प्रकारात सलोनी आणि सलमान या जोडीने उत्कृष्ट सादरीकरण करत ३१ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले. १२ वर्षांखालील एकल नृत्य गटात पाखी घागरघुंडे हिने प्रथम क्रमांक मिळवला, तर खुल्या एकल गटात दर्शना चौहान हिने प्रथम पारितोषिक जिंकले. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात गरबा आणि दांडियाच्या तालावर स्पर्धकांनी रंगतदार सादरीकरण केले. पारंपरिक वेशभूषा, आकर्षक नृत्यशैली आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे मैदानावर नवरात्रोत्सवाचा आनंद ओसंडून वाहत होता. स्पर्धकांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महोत्सवादरम्यान लकी ड्रॉच्या माध्यमातून १५ भाग्यवान विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच वर्षभर भाजपच्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या सहचारिणी महिला ग्रुपला पक्षाच्या वतीने २१ हजार रुपयांचे विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंदन सिंह चंदेल यांच्या नेतृत्वाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पारितोषिक वितरण समारंभात चंदन सिंह चंदेल, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा वैशाली जोशी यांच्यासह अन्य महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. विजेत्यांचा सन्मान, सहभागींचा उत्साह आणि गरबा-दांडियाच्या जल्लोषात कमल गरबा महोत्सवाची दिमाखदार सांगता झाली.





  Print






Related Photos