नागभीड-नागपूर महामार्गावर पेट्रोल टँकरची दुचाकीला धडक : गंभीर जखमी तरुणाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : नागभीड- नागपूर महामार्गावरील कांपा ते विकली गावादरम्यान वाघोबा देवस्थानाजवळ पेट्रोल टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. यादव दुमाणे ३५ वर्ष, रा. देऊळगाव ता. आरमोरी, जि. गडचिरोली असे मृत तरुणाचे नाव आहे. ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल टँकर क्रमांक एमएच ३४ एबी ४९४९ नागभीडकडून नागपूरच्या दिशेने जात होता. दरम्यान, कांपा गावाच्या दिशेने येणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच ३३ एएल १९५३ ला वाघोबा देवस्थानाजवळ टँकरने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार यादव दुमाणे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. जखमीला तातडीने रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालय, नागभीड येथे दाखल करण्यात आले.
मात्र, प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे पाठविले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, नागभीड पोलिसांनी अपघातातील पेट्रोल टँकर चालक आशिष धनराज मोहतुरे ३६ वर्ष, रा. महागाव (खात), ता. मौदा, जि. नागपूर याच्याविरुद्ध निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून अपघात घडविल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली आहे. अपघातातील दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहेत.




Petrol Price




